शेतकऱ्यांना दिलासा : पिकांना जीवदान, मात्र अजूनही दमदार पावसाची गरज
बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली तरी पावसाला म्हणावा तसा जोर नव्हता. मात्र इतर दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी पावसाला काहिसा जोर दिसून आला. दिवसभर अधूनमधून दमदार सरी कोसळल्या. त्यामुळे पहिल्यांदाच मान्सूनच्या पावसाने गटारी भरून पाणी वाहताना दिसून आले. याचबरोबर रस्त्यावरही काही ठिकाणी पाणी साचून असल्याचे आढळून आले. यावर्षी वळिवाने पूर्णपणे पाठ फिरविली. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये एक दोन वळीव पाऊस कोसळले होते. त्यानंतर मान्सूननेही पाठ फिरविली होती. मान्सूनचे आगमन झाले तरी पावसाला जोर नसल्यामुळे पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. दमदार पाऊस पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र पावसाने ही अपेक्षा फोल ठरविली आहे. शुक्रवारी पावसाचा जोर दिसून आला. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला, असे असले तरीही अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. शुक्रवारी दमदार सरी कोसळल्यामुळे शहरातील फेरीवाले, बैठे व्यापारी व खरेदीदारांची चांगलीच तारांबळ उडाली होती. दमदार सरी कोसळत असल्यामुळे साऱ्यांनाच आसरा शोधावा लागला. दिवसभर अधूनमधून दमदार सरी कोसळत होत्या. स्मार्ट सिटीयोजनेंतर्गत करण्यात आलेल्या अनेक रस्त्यांवर पाणी साचून होते. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामांच्या दर्जाबाबतदेखील चर्चा सुरू होती. काही ठिकाणी अजूनही अर्धवट कामे आहेत. त्या ठिकाणी तर मोठी समस्या निर्माण झाली होती. चिखलाचे साम्राज्य पसरले होते. त्यामधून पादचाऱ्यांना आणि दुचाकीस्वारांना ये-जा करावी लागत होती. त्यामुळे नाराजी व्यक्त होत होती.
बळीराजाच्या आशा पल्लवीत
काही प्रमाणात पावसाने जोर घेतल्यामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. असाच दमदार पाऊस आणखी काही दिवसतरी पडणे गरजेचे आहे. दमदार पाऊस कोसळला तरच नदी, नाले, प्रवाहित होणार आहेत. त्यानंतरच पाण्याची समस्या सुटणार आहे. त्यामुळे अजूनही दमदार पावसाकडेच जिल्हा प्रशासन तसेच सर्वसामान्य जनतेच्या नजरा लागून आहेत. शुक्रवारी झालेल्या या पावसामुळे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांची काही प्रमाणात तारांबळ उडाली. या पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला होता. दमदार पावसामुळे रेनकोट, छत्र्या यांचा आधार साऱ्यांनाच घ्यावा लागत होता.
मार्केटमध्ये दलदलमुळे व्यावसायिकांना फटका
पावसाला सुरुवात झाल्यानंतर मार्केटमध्ये दलदल झाली आहे. शुक्रवारी तर भाजी कुजून दुर्गंधी पसरली होती. त्यामधून वाट काढताना साऱ्यांचीच तारांबळ उडत होती. गटारीतील माती तसेच कचरा बाजूला काढून टाकण्यात आला आहे. या पावसामुळे तो कचरा रस्त्यावर पसरला होता. त्यामुळे ये-जा करणेदेखील अवघड झाले होते. या पावसामुळे कलमठ रोड, रविवार पेठ, नरगुंदकर भावे चौक, गणपत गल्ली या परिसरात दलदल पसरल्यामुळे व्यावसायिकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे.









