चिपळूण / राजेंद्र शिंदे :
जुलै २०२१च्या महापुरानंतर मंगळवारी चिपळूणच्या बाजारपेठेत घुसलेल्या पुराला मुख्यतः वाशिष्ठीचे खोरे हे प्रमुख कारण असल्याचे पूर अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. तब्बल २ हजार १६९ चौरस किलोमीटर इतक्या विस्तीर्ण वाशिष्ठी खोऱ्यात होणाऱ्या ‘अतिवृष्टी’ च्या पाण्यावर जोपर्यंत इलाज सापडत नाही तोपर्यंत कितीही उपाययोजना केल्या तरी चिपळूणवरील पुराची टांगती तलवार कायम राहणार, हे आता अधोरेखित झाले आहे. गाळ उपसा, नलावडा बंधारा, कोळकेवाडी अवजल अभ्यास गटाने सुचवलेल्या मानक कार्य प्रणाली अर्थात स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर म्हणजेच एसओपीची प्रभावी अंमलबजावणी यासारख्या उपाययोजना केल्या तरी त्यातून पूर नियंत्रित होईल, पण पूर्णपणे सुटका होणारी नाही हे स्पष्ट झाले आहे.
महापुरानंतर तब्बल चार वर्षांनी मंगळवारी वाशिष्ठी नदीने इशारा पाणीपातळी ओलांडून शहरात शिरकाव केला. दुपारनंतर पावसाचा जोर कमी होऊन पाणी ओसरल्यानंतर चिपळूणवरील पुराचे संकट टळले. या पुरात नुकसान झालेले नसले तरी पुराची टांगती तलवार व्यापारीवर्गासह नागरिकांमध्ये कायम राहिली. कोळकेवाडीतून वीजनिर्मितीनंतर समुद्रातील भरती-आहोटीवर केले जाणारे पाणी सोडण्याचे नियोजन, गेली चार वर्षे सुरू असलेला नद्यांतील गाळ उपसा, मुरादपूर येथे वाशिष्ठी नदीत बांधलेली अवाढव्य भिंत आणि त्याचे फलित याची चर्चा सर्वत्र सुरू झाली. मात्र त्या दिवशीच्या २४ तासांत चिपळूण तालुक्यात कोसळलेला पाऊस आणि वाशिष्ठीच्या खोऱ्यातील पाऊस याची माहिती आल्यानंतर या पुराचे वास्तव समोर येत आहे.
- चिपळुणात २४ तासांत १६२ मि. मी. पाऊस
येथील तहसीलदार कार्यालयातील मुख्य नियंत्रण कक्षातून दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ५ दिवसात तालुक्यातील दसपटी भागातील कळकवणे मंडळात सर्वाधिक १००० मि. मी पाऊस पडला आहे. मंगळवारी चिपळूण मंडळात १५० मि.मी., खेर्डीमध्ये १५७ मि.मी. सावर्डेमध्ये १६२ मि.मी., वहाळमध्ये १३५ मि.मी., असुर्डेमध्ये १६२ मि.मी रामपूरमध्ये १६४ मि.मी., कळकवणेमध्ये २०० मि. मी., शिरगांवमध्ये १८३ मि.मी., मार्गताम्हानेमध्ये १४९ मि.मी. असा सरासरी १६२.४ मि. मी. पाऊस कोसळला. मात्र हा पाऊस शहरात पूर मरण्याइतपत नसल्याचे यापूर्वीच्या पूरस्थितीतील आकडेवारीवरुन स्पष्ट होते.
- वाशिष्ठी खोऱ्यातील पर्जन्यमान काय सांगते?
२०२१च्या महापुरानंतर २०२२च्या पावसाळी हंगामातील चौवीस तासातील सर्वोच्च पाऊस ६ जलै रोजी कोळकेवाडी धरण येथे १८९ मि. मी., तर पोफळी येथे त्याच दिवशी १६२ मि. मी. पडला होता. तसेच २०२३च्या पावसाळी हंगामात कोळकेवाडी धरण परिसरात १९ जुलै रोजी २२७ मि.मी., तर पोफळी येथे त्याच दिवशी २४५ मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली होती. तर यावर्षीच्या हंगामात १६ ऑगस्ट रोजी कोळकेवाडीत २३० मि. मी. आणि १९ ऑगस्ट रोजी पोफळीत १८४ मि. मी. अशी सर्वोच्च नोंद झाली आहे. वाशिष्ठी खोऱ्यात एकूण पाच ठिकाणाच्या खोऱ्यांतून पावसाचे पाणी येते.
खेडच्या पंधरागांवमधून, तिवरे, कोळकेवाडी, पोफळी आणि अडरे-अनारी या भागातून आलेले पाणी हे वाशिष्ठी नदीला मिळते. यातील फक्त कोळकेवाडी घरण आणि पोफळीतील वळण बंधारा त्या खोऱ्याातील पाणी नियंत्रित करते. मात्र तोही गाळाने भरलेला आहे. उर्वरित ठिकाणचे पाणी थेट नदीला येऊन मिळते. शिवाय पोफळी आणि कोळकेवाडी येथील पाऊस धरण व्यवस्थापन विभागाकडून मोजला जातो. उर्वरित ठिकाणची मोजदाद नाही. मंगळवारी पराच्यावेळी दसपटीतून वाहणाऱ्या नद्यांतील पुराचे रौद्ररुप त्या खोऱ्यात झालेल्या अतिवृष्टीचे परिणाम दर्शवणारे ठरतात. त्यामुळे पावसाची समोर आलेली आकडेवाडी कमी दिसत असली तरी उर्वरीत खोऱ्यामध्ये ढगफुटीसारखा झालेला पाऊसच मंगळवारच्या पुराला काहीसा कारणीभूत ठरला असल्याचे दिसून येत आहे.
- कोळकेवाडी अभ्यास गट अहवालावर कार्यवाही आवश्यक
कोळकेवाडी अवजल अभ्यास गटाने महापुरानंतर जून ते ऑगस्ट २०२२ या तीन महिन्यात यापूर्वी येऊन गेलेले पूर आणि त्यावेळचा पाऊस यांचा तुलनात्मक अभ्यास करत काही निष्कर्ष काढले. उपाययोजनांसह काही शिफारशीही सूचवत शासनाला १२८ पानी अहवाल सप्टेंबर २०२२मध्ये सादर केला. मात्र त्यातील मानक कार्य प्रणाली म्हणजे भरती ओहोटीवर सोडल्या जाणाऱ्या पाण्याचे नियोजन सोडले, तर आजतागायत या अहवालावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही.
गेली तीन वर्षे पावसाळी हंगामात अवजलाचे काटेकोर पालन कोयना सिंचन विभागाचे धरण व्यवस्थापन, पोफळी येथील महाजनको आणि प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या समन्वयाने करण्यात येत आहे. त्यामुळे पुराची पातळी कमी ठेवण्यात ही प्रणाली महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. अवजल पाण्याचे पालन तसेच सिंचन विभागाचे व्यवस्थापन या सगळ्याची मंगळवारी उद्भवलेल्या पुराच्यावेळी प्रचिती आली.
- उपाययोजनांमुळे पूर नियंत्रित
जलसंपदा विभागाने गेल्या चार वर्षात वाशिष्ठी नदीतून टप्पा क्रमांक १ आणि दोनमधून २०.३८ लाख घनमीटर गाळ उपसा केला असून त्यावर १३ कोटी ४१ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. मुरादपूर परिसराला वाशिष्ठी नदीत २० कोटीची भिंत उभारुन संरक्षण दिले गेले. वाशिष्ठीचा जुना पूल तोडण्यात आला. कोळकेवाडीचे अवजल नियंत्रित करण्यात आले. या सर्व उपाययोजना फलदायी ठरल्याने मंगळवारी पुराची तीव्रता कमी झाली. यापुढेही पूर नियंत्रणासाठी अनेक योजना प्रस्तावित असल्या तरी त्या निरंतर चालणाऱ्या आहेत. या सर्व गोष्टी पूर्ण झाल्यावर पूर येणारच नाही, अशी कुठलीच यंत्रणा, अभ्यासक छातीठोकपणे सांगू शकणार नाहीत. वाशिष्ठीच्या खोऱ्यांतील अतिवृष्टीचे संकट हे पावसाळी हंगामात कायम राहणारे आहे.
- अतिवृष्टी पुराला कारणीभूत
२०२१ नंतरची चार वर्षाची पावसाची आकडेवारी पाहता मंगळवारी कोळकेवाडी येथे चौवीस तासात पडलेला २३० मि.मी. पाऊस २०२३ आणि २०२४च्या पर्जन्यमानापेक्षा कमी होता. त्यादिवशी वाशिष्ठीच्या २ हजार १६९ चौरस किलो मीटर ऐवढ्या अवाढव्य खोऱ्यामध्ये २०० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला असण्याची शक्यता आहे. ‘एसओपी’चे काटेकोरपणे पालन होऊनही चिपळूण शहरात पाणी शिरले. याला वाशिष्ठीच्या खोऱ्यात झालेली अतिवृष्टी कारणीभूत होती असे वाटते.
– संजीव अणेराव, सदस्य, चिपळूण महापूर आणि कोळकेवाडी अवजल अभ्यास गट, महाराष्ट्र शासन
- पूरमुक्तीचा अॅक्शन प्लॅन आवश्यक
गोवळकोटपर्यंतच्या वाशिष्ठीच्या पाणलोट क्षेत्रात (५५०-६५० चौ. कि. मी.) पडणाऱ्या अतिवृष्टीच्या पाण्याला चिपळूण शहरात येण्यास एक ते दोन दिवस उशीर केला तर चिपळुणात छोटासाही पूर येणार नाही. तसेच लाल-निळ्या रेषाही नदीपात्रात जातील. सीडब्लूसीच्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारावर अचूक आणि शास्त्रीय असा पूरमुक्तीचा अॅक्शन प्लॅन तयार करणे आवश्यक आहे आणि त्याची अंमलबजावणीही करायला हवी.
– आशिष जोगळेकर, चिपळूण पुरासंदर्भात उच्च न्यायालयातील याचिकाकर्ता








