सांगली :
पाणलोट क्षेत्रात बुधवारीही अतिवृष्टी सुरूच असल्याने धरणातील पाणीसाठ्यात गतीने वाढ होऊ लागली आहे. अलमट्टी धरणाचा वाढता साठा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठाची धास्ती वाढवू लागला आहे. अलमट्टी प्रशासनाने विसर्ग कमी केला असून साठा 517 मीटरच्या पुढे गेला आहे. 123 टीएमसीच्या या धरणात बुधवारपर्यंत 87.74 टीएमसी साठा झाला असून कोयना वारणासह अन्य धरणांच्या साठ्यातही वाढ होऊ लागली आहे.
अलमट्टी धरणातील पाणीसाठा कमी करावा, अशी मागणी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठाच्या नागरिकांसह सांगली जलसंपदा विभागाने केली आहे. पेंद्रीय जलआयोगाच्या नियमानुसार या धरणातील साठा ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे. परंतू गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने अलमट्टी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. त्याचा फुगवटा येत असल्याने महापुराचा धोका निर्माण झाला असल्याने नदीकाठ धास्तावला आहे.
जिल्ह्यातील वारणा धरणात मंगळवारी 25.31 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. आहे. 105.25 टीएमसी क्षमतेच्या कोयना धरणातील साठा 56.03 टीएमसी झाला आहे. या दोन्ही धरणातील साठ्यात दिवसात सरासरी तीन ते चार टीएमसीने वाढ झाली आहे.
बुधवारी महाबळेश्वरमध्ये 59 तर नवजामध्ये 70 मिमी पावसाची नोंद झाली. जिल्हयासह धरण आणि नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. विविध धरणातील पाणीसाठा व कंसात साठवण क्षमता टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे.
कोयना 56.08 (105.25), धोम 8.44 (13.50), कन्हेर 7.03 (10.10), धोम बलकवडी 1.39 (4.08), उरमोडी 7.24 (9.97), तारळी 4.28 (5.85), वारणा 25.31 (34.40), राधानगरी 5.56 (8.36), दूधगंगा 13.23 (25.40), तुळशी 2.30 (3.47), कासारी 1.76 (2.77), पाटगांव 2.88 (3.72), अलमट्टी 87.74 (123).








