वारणावती / भरत गुंडगे :
चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची आवक ६ हजार ७३७ क्यूसेक सुरू आहे. चांदोली धरण ८१.८३ टक्के भरले आहे. पश्चिम विभागात पावसाचा जोर बाढला आहे. गेल्या २४ तासात ५७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून ६ हजार ७३७ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणात सध्या २८.१५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्याची टक्केवारी ८१.८३ आहे. पाणीपातळी ७७९.३८८ मिटर झाली आहे. धरण परिसरात गेल्या २४ तासात ५७ मिलीमीटर पावसासह आजअखेर एकूण १ हजार ४२१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. परिसरामध्ये गेल्या आठवडा भर होणाऱ्या अतिवृष्टीमुळे शामराव केरु पाटील (रा. मणदूर, ता शिराळा) यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून लाखो रुपयेचे नुकसान झाले आहे. तर मराठेवाडी येथील ईश्वरा बाळू मराठे यांच्या घराची भिंत कोसळली आहे.

भिंत कोसळल्याने सुदैवाने कोणतीही जिबीतहानी झाली नाही. पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
- सतर्कतेचा इशारा
बारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत होणारी बाढ कमी झाली आहे. जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता धरणातून दिनांक ७ रोजी सकाळी ११ वाजता वक्र द्वाराद्वारे सुरू असणारा २८७० क्युसेक विसर्ग न बाढबता तो २८७० क्युसेक्स कायम ठेवण्यात आला आहे. विद्युतगृहातून चालू असणारा १६३० क्युसेक विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे. दोन्ही मिळून एकूण ४५०० क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात कायम ठेवण्यात आला आहे. पाऊस चालू राहिल्यास अथवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार बिसर्ग वाढवण्यात येईल. तरी नदीकाठच्या लोकांनी सतर्कता बाळगावी असा इशारा बारण धरण व्यवस्थापनाने दिला आहे.








