अनेक रस्ते, पूल पाण्याखाली : किनारपट्टीवरून वाहणाऱ्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
कारवार : जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरश: हाहाकार माजविला आहे. गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून उसंत न घेता कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील किनारपट्टीवासियांची त्रेधातिरपीट उडाली आहे. किनारपट्टीवरील तालुक्यांच्या बरोबरीने गेले काही दिवस घाटमाथ्यावरील जोयडा, दांडेली, हल्याळ, सिद्धापूर, शिरसी, यल्लापूर आणि मुंदगोड तालुक्यातही पावसाने जोर धरल्यामुळे जिल्ह्याच्या किनारपट्टीवरून वाहणाऱ्या काळी, अद्यनाशीनी, गंगावळी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. हवामान खात्याने जिल्ह्याच्या किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील किमान चार-पाच दिवस किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. जोरदार पावसामुळे दांडेली, जोयडा, यल्लापूरसह अन्य तालुक्यात घरे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. जोयडा तालुक्यासह अन्य ठिकाणीही रस्ते, पूल पाण्याखाली गेले आहेत. कारवार तालुक्यातील कद्रा येथील महामाया देवस्थानाला पाण्याने वेढा घातला आहे. कारवार, अंकोला आणि होन्नावर तालुक्यातील काही भागात घरामध्ये पाणी घुसण्याच्या घटना घडल्या आहेत.
नशीब बलवत्तर म्हणून दोन कुटुंबीय वाचले
किनारपट्टीवरील कुमठा तालुक्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कुमठा नगरातील उप्पीन गणपती देवस्थानाजवळ असलेल्या गंगाधर कृष्णा गौडा आणि गणेश तिम्मण्णा गौडा यांच्या मालकीच्या घरावर रविवारी पहाटे वडाचे झाड कोसळले. तथापि, वृक्ष कोसळल्याची चाहूल लागताच गौडा कुटुंबीयांनी लहान मुलासह घरातून पळ काढला. त्यामुळे केवळ नशीब बलवत्तर म्हणून दोन्ही कुटुंबे सुखरुप बचावली. गेल्या तीन दिवसांपासून कारवार तालुक्यातील काळी नदीवरील कद्रा जलाशयातून कारवार अतिरिक्त पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. बोम्मनहळ्ळी जलाशयही भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून धरणाचे दरवाजे कुठल्याही क्षणी उघडले जाणार आहेत.
कद्रा येथे एसडीआरएफची टीम सज्ज
कद्रा जलाशयातून सोडण्यात येणाऱ्या अतिरिक्त पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी कद्रा येथे दहा सदस्यांचा समावेश असलेली एसडीआरएफचे पथक आणि पाच होड्या कद्रा येथे सज्ज ठेवल्या आहेत. नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केलेले आरएफओ व कारवारचे तहसीलदार गेल्या तीन दिवसांपासून कद्रा येथे मुक्काम ठोकून आहेत.
जोयड्यातील कुंडल पूल पाण्याखाली
जोयडा तालुक्यातील कातेली ग्रा. पं. व्याप्तीतील अप्पर काणेरी जलाशयाच्या बॅकवॉटरमुळे पुंडल पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे कुंडल, कुरावली, नवर, अंबाली येथील ग्रामस्थांची मोठी पंचाईत झाली आहे. जोयडा तालुक्यातील कारवार-बेळगाव रस्त्यावरील आनशी घाटात दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. परिणामी या रस्त्यावरील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शाळांना आज सुटी
गेल्या अनेक दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे कारवार जिल्ह्यातील परिस्थिती बिघडली आहे. रविवारी सकाळी संपलेल्या 24 तासांत तालुक्यात 104 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे दि. 24 रोजी कारवारमधील अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा व पदवीपूर्व महाविद्यालयांना जिल्हाधिकारी प्रभुलिंग कवळीकट्टी यांनी सुटी जाहीर केली आहे.









