वृत्तसंस्था/ ईटानगर
अरुणाचल प्रदेशात अतिवृष्टीचा कहर दिसून आला आहे. अरुणाचल प्रदेशातील अंजाव जिल्ह्याचा देशाच्या उर्वरित हिस्स्याशी असलेला संपर्क 8 दिवसांपासून तुटलेला आहे. भारत-चीन आणि भारत-म्यानमार सीमेला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग-113 चे मोठे नुकसान झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. या महामार्गावरील अरोवा-खुपा-हायुलियांगच्या मोनपानी भागातही स्थिती बिघडली आहे. यामुळे स्थानिक लोकांना मोठी समस्या होत असून रणनीतिक स्वरुपात महत्त्वपूर्ण चिनी सीमेला लागून असलेल्या भागांपर्यंत पोहोचणे अवघड ठरत आहे.
मार्ग बंद झाल्याने किबिथू आणि चगलगामपर्यंत पोहोचणे अवघड ठरले आहे. चीन आणि म्यानमारच्या सीमेवरील हे दोन्ही भाग रणनीतिक स्वरुपात अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. तर अनेक भागांमध्ये स्थानिक समुदायांच्या लोकांशी असलेला संपर्क तुटला आहे. खासकरून हायुलियांग, हवाई आणि आसपासच्या गावांमध्ये सामग्रीची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. वाहतूक ठप्प असल्याने अनेक लोक कित्येक किलोमीटर पायपीट करून आवश्यक सामग्री आणत आहेत.
दिशानिर्देश जारी
स्थानिक अधिकाऱ्यांनी प्रवासविषयक दिशानिर्देश जारी केले आहेत. यात स्थानिक रहिवाशांना रात्री प्रवास करणे टाळण्यास आणि खबरदारी बाळगण्यास सांगण्यात आले आहे. याचदरम्यान राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तसेच स्थानिक आमदार दासांग्लू पूल यांनी स्थितीची पाहणी केली आहे. मोनापानी येथे महामार्ग दुरुस्तीचे काम सुरू असून विविध ठिकाणी अडकून पडलेल्या लोकांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
तात्पुरत्या मार्गाची निर्मिती होणार
अस्थायी स्वरुपात एका मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. भविष्यात कुठल्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास या मार्गाचा वापर केला जाणार आहे. स्थिती सामान्य झाल्यावर या नव्या मार्गासाठी काम सुरू होणार आहे. एनएच-113 कॉरिडॉर हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ही आमची जीवनरेषा आहे. या संकटाच्या काळात लोकांनी शांतता अन् सहकार्य कायम ठेवावे. लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.









