रस्त्याकडेचे गटार न उपसल्याने वाहतुकीत अडथळे : वाहन चालकांत नाराजी
प्रतिनिधी / सांखळी
सांखळी शहरासह ग्रामीण भागात गुरुवारी संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळला. हवामानात गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
अचानक पाऊस सुरू झाल्याने प्रवाशांसह कामावर गेलेल्या लोकांची तारांबळ उडाली. मात्र, मुख्य रस्त्याच्या बाजूचे गटार न उपसल्याने रस्त्यांवर पाणी साचले. यामुळे वाहन चालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. सांखळी मतदारसंघात पाळी, वेळगे, सुर्ल, कुडणे, न्हावेली, आमोणा, हरवळे आदी भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.
होंडा-फोंडा रस्त्यावर पाणी
सांखळी-पर्यें मतदारसंघाच्या सीमेवरील होंडा-फोडा या मुख्य रस्त्याकडेचे गटार न उपसल्याने गेली कित्येक वर्षे पाणी साचून वाहन चालकांची मोठी गैरसोय होते. हे गटार कोणी उपसाव्यात यावरच एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एक भाग सांखळी नागर पालिका हद्दीत येतो तर दुसरा भाग होंडा ग्रामपंचायत हद्दीत येत असल्याने या कडे दोघांचेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सांखळी नगराध्यक्ष राजेश सावळ आणि पये आमदार डॉ दिव्या राणी यांनी याकडे विशेष लक्ष देऊन सदर समस्या सोडवावी, अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे.









