ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली-विद्युत खांबही कोसळले : कोथिंबीर, बिन्स, मिरची, भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
वार्ताहर/किणये
मच्छे-पिरनवाडी भागात रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. वादळी वारा आणि पावसामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी विद्युत खांब कोसळले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. मच्छे औद्योगिक वसाहतीमधील काही दुकानांवर विद्युत खांब व झाडे पडल्याने दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बेळगाव पणजी महामार्गावरील मच्छे येथे मुख्य रस्त्यावर झाड कोसळले होते.
रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे वाहतुकीची कोंडी
वाघवडे-मच्छे संपर्क रस्त्यावर मच्छेनजीक रस्त्याच्या मध्यभागी झाड कोसळून पडले. यामुळे वाघवडे मच्छे संपर्क रस्ता पूर्णपणे ठप्प झाला होता. रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. ठिकठिकाणी विद्युत खांब व तारा पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित केला.
चहा कॅन्टीनवर झाडे कोसळून नुकसान
औद्योगिक वसाहतीमधील चहा कॅन्टीनच्या तीन दुकानांवर झाडे कोसळून पडली यामुळे सदर दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रविवारी सकाळपासूनच उष्णतेमध्ये वाढ झाली होती. दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.
झाडशहापूर परिसरात पाऊस
याचबरोबर बामणवाडी परिसरातही काही ठिकाणी झाडे कोसळून पडली. हा पाऊस संतिबस्तवाड, वाघवडे, बामणवाडी, बाळगमट्टी, जानेवाडी, बिजगर्णी, बेळगुंदी, बेळवट्टी, सोनोली, यळेबैल राकसकोप, इनाम बडस, बाकनूर, झाडशापूर या भागात मुसळधार पाऊस झाला. काही गावातील नागरिकांच्या राहत्या घरावरील पत्रेही उडून गेले. यामुळे घरातील जीवनावश्यक साहित्याचे नुकसान झाले. शनिवारी सायंकाळीही या भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे कोथिंबीर, बिन्स, मिरची व भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.









