पणजी हवामान खात्याचा इशारा : आतापर्यंत दाबोळीत सर्वाधिक पाऊस
पणजी : राज्यात गेल्या दोन दिवसांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने बहुतेक सर्व नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरू झाला आहे. काल सोमवारी दुपारपासून अनेक भागात पावसाने थोडी विश्रांती घेतली. दरम्यान, 30 जूनपर्यंत गोव्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शुक्रवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाने शनिवारी बराच जोर धरला होता. त्यामुळे नद्यांमधील पाण्याचे प्रवाह रविवारी सुरू झाले. गेल्या दोन, तीन दिवसांमध्ये सर्वत्रच दमदार पाऊस झालेला आहे. आतापर्यंत गोव्यात यंदाच्या मौसमात सर्वाधिक पाऊस हा दाबोळी येथे पडलेला आहे. गेल्या 24 तासांमध्ये म्हापसा 2 इंच, पेडणे 1.5 इंच, फोंडा सर्वाधिक 3.5 इंच, पणजी 1. 5 इंच, जुने गोवे 1. 50 इंच, सांखळी 2.25 इंच, काणकोण 1 इंच, दाबोळी 2 इंच, मडगाव 1 इंच, मुरगाव 1. 25 इंच, केपे 2 इंच, सांगे 1. 50 इंच एवढी पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने सायंकाळी जारी केलेल्या माहितीनुसार दि. 30 जूनपर्यंत गोव्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळणार आहे. सर्वत्र वादळीवारे वाहणार असून वाऱ्याचा वेग ताशी 55 ते 65 कि. मी. पर्यंत असण्याची शक्यता आहे.
अंजुणे परिसराच्या स्थितीमध्ये बदल नाही.
सांखळी परिसरात आतापर्यंत 12 इंच पाऊस झाला आहे. विर्डी (महाराष्ट्र) या व आजूबाजूच्या वनराईत जोरदार पाऊस पडल्याने वाळवंटी नदी प्रवाहित झाली. मात्र अत्यल्प पावसामुळे अंजुणे परिसराच्या स्थितीमध्ये अद्याप कोणताही बदल झालेला दिसत नाही. धरण ओलित क्षेत्रात पाण्याचे झरे प्रवाहित होऊन ते धरण क्षेत्रात जमा होईल, अशी पावसाची स्थिती सध्यातरी नाही. त्यामुळेच अंजुणे परिसरात उद्भवलेली ही स्थिती अद्याप गंभीरच आहे. सोमवारी सायंकाळी देखील पाऊस पडण्यासारखी स्थिती अंजुणे परिसरात नव्हती.
आतापर्यंतच्या पावसाची नोंद
- दाबोळी 20 इंच
- केपे 18 इंच
- सांगे 17 इंच
- काणकोण 16 इंच
- म्हापसा 14 इंच
- पेडणे 13 इंच
- सांखळी 12 इंच
- जुने गोवे 11 इंच
- पणजी 10 इंच
- मुरगाव 9 इंच
अंजुणे : परिस्थिती अद्याप चिंताजनक, केवळ 6 इंच पावसाची नोंद
ज्या भागात दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो त्या वाघेरी डोंगर परिसरात यंदा अत्यल्प पाऊस पडलेला आहे. चोर्ला घाट परिसरात आतापर्यंत केवळ 6 इंच पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी फक्त 3.5 मि. मी. एवढाच पाऊस पडला. रविवारी थोडा वेळ दमदार पाऊस पडल्यामुळे धरणामध्ये एकदम 1 मीटरने पाणी वाढले आहे. परंतु हे पाणी देखील एकदम तळात असल्याने त्याची व्याप्ती एकदम कमी आहे. पाऊस पूर्णत: बंद झाला तर अंजुणे धरणात केवळ तीन दिवस पुरणार एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.









