संगमेश्वर, खेड, लांजा :
जुलै महिन्यात विश्रांती घेणाऱ्या पावसाने रत्नागिरीसह जिल्ह्यात मंगळवारी जोरदार पुनरागमन केले. धुवाँधार पावसामुळे संगमेश्वर, माखजन, फुणगूस बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले. रामपेठ बाजारपेठ पूर्णत: जलमय झाली. संगमेश्वर-देवऊख मार्गावर बुरंबीनजीक 3 ठिकाणी नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने हा मार्ग सकाळी 8 वाजल्यापासून बंद होता. खेडमध्ये जगबुडीच्या पुराचे पाणी मटण-मच्छी मार्केटमध्ये घुसले. लांजात काजळी नदीच्या पुरामुळे आंजणारी-मठ येथील स्वयंभू श्री दत्त मंदिर परिसर पुराच्या पाण्याने वेढला. चिपळुणात वाशिष्ठी व शिवनदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. तसेच राजापुरातही अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पुराची शक्यता निर्माण झाली आहे.

सोमवारी रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने संगमेश्वर तालुक्यातील संगमेश्वर, माखजन, फुणगूस बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले. संगमेश्वरमधील शास्त्राr नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढल्यामुळे रामपेठ बाजारपेठ पूर्णत: जलमय झाली. जोरदार पावसामुळे विद्यार्थ्यांना मंगळवारी शाळेत पोहोचणेही अवघड झाले. रामपेठ येथील मुख्य रस्ते व गल्लीबोळ पाण्याखाली गेले असून व्यापार ठप्प झाला आहे. अनेक दुकाने व घरे पाण्यात बुडाल्याने लाखो ऊपयांचे नुकसान झाले. स्थानिक नागरिक व ग्राहकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शास्त्राr नदीची पातळी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांना आपले मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणताही अनर्थ टाळण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. रत्नागिरीच्या अन्य भागांतही पावसाचा जोर कायम असून अनेक मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही गावांचा संपर्क तुटला आहे. असुर्डे येथील पुलावर पाणी आल्याने हा मार्ग बंद झाला आहे. संगमेश्वर-कसबा-नायरी मार्गावर कसबा येथे शास्त्राr नदीचे पाणी मोरीवर आल्याने संगमेश्वर-कसबा-नायरी वाहतूक मंद गतीने सुरू होती. कसबा न्यू इंग्लिश स्कूलच्या तळघरातील वर्गात पुराचे पाणी शिरल्याने शाळा व्यवस्थापनाची दाणादाण उडाली. संगमेश्वर-डिंगणी मार्गावरही शास्त्राr नदीच्या पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक पुराचे पाणी भरल्यामुळे पूर्णत: ठप्प झाली .
- संगमेश्वर आठवडा बाजारात पुराचे पाणी
सोमवारी रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे शास्त्राr व सोनवी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. संगमेश्वर आठवडा बाजारात पुराचे पाणी घुसले. पुराचे पाणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन संगमेश्वर येथील नदी किनाऱ्यालगतच्या व्यापाऱ्यांनी आपला माल सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुऊवात केली. तसेच चौपदरीकरणदरम्यान मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्याने तसेच महामार्गावरील पाण्याचे नियोजन नसल्याने संगमेश्वर परिसरातील वाहतूक संथ गतीने सुरू होती.
- हजारो एकर शेती पाण्याखाली
रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वरान हजारो एकर शेती पाण्याखाली गेली. त्यामुळे भातशेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माखजन बाजारपेठ पुराच्या पाण्याखाली असून येथील दुकानात पुराचे पाणी घुसले.

- कोंडआंबेडमध्ये दरड कोसळून घराचे नुकसान
सलग 2 दिवस पडणाऱ्या पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील अनेक भागात नागरिकांची झोप उडाली आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे मौजे कोंडआंबेडमधील मोहन रामचंद्र रहाटे यांच्या घरामागील डोंगर उतारावरून दरड कोसळली. या घटनेत घराच्या पाठीमागील भिंतीला तडा गेल्याची माहिती असून काही प्रमाणात घराचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ग्रामपंचायत व महसूल विभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने तत्काळ मदत करावी, अशी मागणी रहाटे कुटुंबीय व ग्रामस्थांनी केली आहे.
- खेडमध्ये पुराच्या अडकलेली महिला सुखरुप
खेडमध्ये सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर मंगळवारी कायम राहिल्याने सकाळच्या सुमारास जगबुडीच्या पुराचे पाणी मटण-मच्छी मार्केटमध्ये घुसले. पावसाची संततधार कायम राहिल्याने बाजारपेठेत पाणी घुसण्याच्या शक्यतेने व्यापाऱ्यांसह नदीकाठच्या रहिवाशांची तारांबळ उडाली. मटण-मच्छी मार्केटजवळील रस्त्यावर पुराच्या पाण्यात अडकलेल्या महिलेस मदतकर्त्यांनी सुखरुप बाहेर काढले. दुपारच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतल्याने पूरस्थितीचा धोका टळताच साऱ्यांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला. पहाटेच्या सुमारास जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यांनतर सकाळी 8.30 च्या सुमारास पुराचे पाणी मटण-मच्छी मार्केटमध्ये घुसताच गोंधळ उडाला. जगबुडी पुराच्या पाण्यात दुचाकीवरून जाणारी महिला अडकल्याचे जागरुक नागरिकांच्या निदर्शनास येताच आरडाओरडा सुरू झाला. क्षणाचाही विलंब न लावता सर्फराज पांगारकर, एजाज खेडेकर यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून महिलेस दुचाकीसह सुखरुप पुराच्या पाण्याच्या बाहेर काढले. धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे नारंगी नदी सभोवतालचा परिसरही जलमय झाला. नजीकची भातशेतीही पाण्यात गेली होती.
- कशेडीत दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यानजीक मंगळवारी दरड कोसळून मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक ठप्प झाली. दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. या कामामुळे वाहतूक एका मार्गिकेवरूनच सुरू होती. शेकडो वाहनचालक वाहतूक कोंडीत अडकले. कशेडी घाटात दरडी कोसळण्याचे सत्र सुरुच असल्याने वाहनचालकांचा जीव टांगणीवर आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे बोगद्यानजीक दरड कोसळल्याने यंत्रणांची धांदल उडाली. मुंबईच्या दिशेकडे जाणारी वाहतूक थोपवण्यात आली. जेसीबीसह इतर यंत्रणांच्या सहाय्याने दरड हटवण्याचे काम तातडीने हाती घेतले. मुसळधार पावसामुळे दरड हटवण्याच्या कामात अडथळे निर्माण झाले. अथक प्रयत्नानंतर मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा होताच वाहतूक पूर्ववत झाली. काही दिवसांपूर्वी धुवाँधार पर्जन्यवृष्टीमुळे बोगद्याजवळच दरड कोसळली होती. दरडी कोसळण्याचा धोका कायम असतानाही राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून ठोस उपाययोजनांच्या दृष्टीने कोणताच अवलंब केलेला नाही. यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे.








