वाळपईत घरावर झाड कोसळल्याने दीड लाखाचे नुकसान
प्रतिनिधी / वाळपई
आज दिवसभर सत्तरी तालुक्याला पावसाने झोडपले. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस लागत होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. आज गुरुवारी पडलेल्या पावसामुळे मान्सूनचे खरे स्वरूप दिसले. दरम्यान, बुधवारी रात्री वादळी वाऱ्यामुळे वाळपई येथील एका घरावर झाड कोसळून सुमारे दीड लाखाची हानी झाली. वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ भेट देऊन घरावर पडलेले झाड हटविले.
सध्या सत्तरीतील डोंगराळ भागांत जोरदार पाऊस लागत आहे. यामुळे या दोन दिवसांमध्ये सत्तरी तालुक्यातील विविध नद्या प्रवाहित होण्याची शक्यता आहे. आज दिवसभर मात्र अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला.
दरम्यान वाळपईत ठाणे मार्गावरील जामा मशीद नजीक मुतांझीर खान यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळून जवळपास दीड लाखाची नुकसानी झाली. सदर प्रकार संध्या. 8 वा. घडला. काही प्रमाणात वादळी वारा झाला. यामुळे सदर झाड घराच्या एका बाजूला पडले व यामुळे घराच्या छपराची मोठी हानी झाली. याबाबत वाळपई अग्निशामक दलाशी संपर्क साधल्यानंतर अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घरावरील अडथळा दूर केला. लाखो ऊपयांची मालमत्ता वाचविण्यात अग्निशामक दलाचे पथक यशस्वी ठरले.
आज दिवसभर पावसाने सत्तरी तालुक्याला झोडपले. सकाळपासून मुसळधार पाऊस सुरूच होता. सत्तरी तालुक्यात सर्वच भागांमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात लागल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाची संततधार यामुळे आज आषाढी एकादशीच्या उत्साहावर काही प्रमाणात विरजण पडले. मात्र दुसऱ्या बाजूने यंदा प्रथमच पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात पडत असल्याबद्दल नागरिकांनी व खास करून शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, जून महिना संपला तरीसुद्धा सत्तरी तालुक्यातील नद्या अद्याप प्रवाहित झाल्या नाहीत. मात्र गुरुवारील कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने कोरड्या पडलेल्या नद्या पुन्हा काही प्रमाणात प्रवाहित होण्यास सुरुवात झाली आहे. इतर कोणत्याही ठिकाणी नुकसान झालेली नाही. तरीसुद्धा रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस होता. आज सकाळपासून पावसाची संततधार सुरूच होती.









