रात्री उशिरापर्यंत पावसाच्या रिपरिपमुळे गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पावसाचा शिडकावा झाला होता. बुधवारपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. त्यामुळे दिवसभर भक्तांनी गणेशमूर्ती घरी आणून पूजाअर्चा केली. सायंकाळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती आणण्याच्या कामाला सुरुवात झाली असतानाच ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. सायंकाळी 6.15 च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे भक्तांना आणि सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांना काहीसा त्रास सहन करावा लागला.
बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण आणि उष्मा वाढला होता. त्यानंतर अचानकपणे पावसाचे आगमन झाले. जवळपास 1 तासाहून अधिक वेळ पाऊस झाला. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना मोठा त्रास झाला. या पावसाचा परिणाम बाजारपेठेवरही झाला.
पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. भक्तांच्या उत्साहावर मात्र विरजण पडले असून जनजीवन विस्कळीत झाले. शहरासह उपनगरांमध्ये पाऊस झाला. त्यामुळे गटारी भरून पाणी रस्त्यांवरून वाहताना दिसत होते. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील कामे सुरू आहेत. मात्र या दमदार पावसामुळे अनेक ठिकाणी भररस्त्यातच पाणी साचून होते. या पावसामुळे पिकांना मात्र पोषक वातावरण तयार झाले आहे. बऱयाच पिकांना पावसाची गरज होती. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पावसाचे आगमन झाल्याने आता दररोज पाऊस कोसळणार का? अशी चर्चा सुरू होती.









