शहरातील रस्त्यांवर पाणी : दिवसभर पावसाची रिपरिप : संततधार हजेरीची गरज
बेळगाव : जोरदार पाऊस पडवा, अशी अपेक्षा साऱ्यांचीच आहे. मात्र अजून तरी जोरदार पाऊस कोसळलाच नाही. शुक्रवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. सायंकाळी मात्र पावसाच्या काही दमदार सरी कोसळल्या. यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. तरीदेखील पावसाची अजूनही दमदार हजेरी लागणे गरजेचे आहे. सध्या पाणीटंचाई आणि पिकांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे अजूनही दमदार पाऊस पडेल, याकडेच साऱ्यांच्या नजरा लागून आहेत. यावर्षी काही दिवस मान्सून बरसला असला तरी या पावसामुळे नदी, नाले प्रवाहीत झाले नाहीत. याचबरोबर शिवारामध्ये पाणी साचले नाही. सध्या झालेल्या पावसामुळे पिकांना केवळ जीवदान मिळाले आहे. असे असले तरी पिके जोमात येण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. महाराष्ट्र, गोवा येथे मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांना दिलासा मिळाला आहे. या दोन्ही राज्यांच्या सीमेवरच बेळगाव जिल्हा वसलेला आहे. त्यामुळे या ठिकाणीही जोरदार पाऊस कोसळेल, अशी अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षा फोल ठरली आहे.
शुक्रवारी सकाळी पावसाची रिपरिप सुरू होती. त्यानंतर काहीवेळ पावसाने उसंत घेतली. दुपारी व सायंकाळी दमदार सरी कोसळल्या. गटारींमध्ये कचरा साचल्यामुळे हे पाणी रस्त्यावर आले होते. दोन दिवसांपूर्वीही गणपत गल्लीमध्ये रस्त्यावरून पाणी वाहत होते. त्यामुळे व्यापारीवर्गाची तारांबळ उडाली होती. मागील सलग तीन वर्षे दमदार पाऊस झाल्यामुळे साऱ्यांचीच तारांबळ उडाली होती. त्या पावसामुळे शहरातील काही भागाला पूरही आला होता. त्यामुळे महापालिकेने खडबडून जागे होऊन गटारी साफ केल्या होत्या. यावर्षी दमदार पाऊस कोसळला नाही. लहान सरी कोसळल्यानंतरही पाणी रस्त्यांवरून वाहत आहे. जर जोरदार पाऊस कोसळला तर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे फेरीवाले, व्यापाऱ्यांची काहीशी तारांबळ उडाली. नागरिकांनाही आडेसा शोधावा लागला. सध्या पावसाला सुरुवात झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र अजूनही दमदार पाऊस कोसळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नदी-नाले प्रवाहीत होणे महत्त्वाचे आहे. कारण जलाशयांनी तळ गाठला आहे. त्यामुळे दमदार पाऊस झाला तरच ही समस्या मिटणार आहे.









