शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस : नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ
खानापूर : जून-जुलै दोन महिने संततधार पाऊस कोसळल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने हळूहळू विश्रांती घेतली होती. गेल्या दहा दिवसांपासून कडक ऊन पडून हवामानात कमालीची उष्णता वाढली होती. मात्र गेल्या शुक्रवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा जोरदार पुनरागमन केले असून शनिवारी दिवसभर आणि रविवारी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे तालुक्यातील नदी-नाल्यांच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासून सर्वत्र कडक ऊन पडत होते. आणि हवामानात कमालीची उष्णता जाणवत होती. ऑगस्ट महिन्यातच ऑक्टोबर हिटचा अनुभव गेल्या पंधरा दिवसांपासून येत होता. शुक्रवारी रात्री अचानक पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी रात्रभर जोरदार पावसाने झोडपले. तर शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत होता. रविवारीही सकाळपासूनच पावसाचा जोर कायम होता. गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी-नाल्यांच्या पातळीत कमालीची वाढ झाली असून सर्व नदी, नाले पुन्हा ओसंडून वाहत आहेत.
नदी-नाल्यांना पुन्हा पूर
खानापूर शहरात मलप्रभा नदीची पाणीपातळी पुन्हा वाढली असून संपूर्ण नदीघाट पाण्याखाली गेला आहे. गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याने सर्वच नदी-नाल्यांच्या पातळीत कमालीची घट झाली होती. मात्र दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाल्यांना पुन्हा पूर आलेला आहे. सध्याच्या पावसामुळे सर्व पिकांना पोषक वातावरण असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.









