पिकांना पोषक : नदी-नाल्यांच्या पातळीत वाढ, शिवारातील शेतीकामांना वेग : रोपलागवडीची लगबग
खानापूर : खानापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. रविवारी रात्रीपासून तर पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. तसेच मंगळवारी व बुधवारी झालेल्या पावसामुळे तालुक्यातील नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत तसेच तलावामध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. पावसाने तालुक्यात सर्वत्र जोर केला असून पश्चिम भागात होणाऱ्या पावसामुळे मलप्रभा नदीसह उपनद्यांची व नाल्यांची पाणी पातळीत मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. पावसामुळे हवामान पूर्णपणे बदलले आहे. हलात्री नदीवरील पुलावर पाणी आल्याने पोलिसांनी या रस्त्यावरील वाहतूक रुमेवाडी क्रॉस येथून पूर्णपणे बंद केली आहे. यामुळे मणतुर्गा येथून असोग्यावरुन लोकांची ये-जा सुरू आहे. तालुक्मयात संततधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. भातरोप लागवडीला प्रारंभ झाला आहे. शिवारातून लगबग वाढली आहे. यावषी पावसाने तब्बल महिनाभर उशिराने हजेरी लावली. त्यानतंर पावसाचा जोर नव्हता, पावसाच्या हलक्मया सरी कोसळत आहेत. खानापूर तालुक्यातील परिसरात सोमवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी व बुधवारी पावसाची संततधार सुरुच होती. परिणामी भातरोप लागवडीच्या कामांना प्रारंभ झाला आहे. शिवारातून शेतीकामाची लगबग वाढल्याचे दिसून येत आहे. अद्याप शिवारातून पाणी साचले नसले तरी पिकांना पोषक वातावरण तयार झाले आहे.
मलप्रभेचा पाण्याचा प्रवाह वाढला
गेल्या दोन दिवसातील पावसामुळे मलप्रभा नदीला मोठ्याप्रमाणात पाणी आले आहे. तर हब्बनहट्टी येथील मलप्रभा नदीत असलेले स्वयंभू हनुमान मंदिर पाण्याखाली गेले आहे. पण पावसाचा जोर असला तरी अद्याप कुठल्याही बंधाऱ्यावर पाणी चढले नाही. गेल्या दोन-तीन दिवसापांसून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधान पसरले आहे. पण आता खानापूर तालुक्यात पश्चिम भागात भातरोप लागवडीचे काम युद्धपाळीवर सुरू आहे. त्यातच आता पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रोप लागवडीला चांगला हंगाम मिळाला आहे. तालुक्यातील पश्चिम भागातील कणकुंबी, जांबोटी, गोल्याळी, निलावडे, नेरसा, शिरोली आदी ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील जवळजवळ सर्व शेतकरी रोप पद्धतीनेच भाताची लागवड करतात. यासाठी मिळालेल्या चांगल्या हंगामामुळे रोप लागवडीतील त्यांच्या उत्साहात मोठी भर पडली आहे.
कणकुंबी भागात मुसळधार : हब्बनहट्टी स्वयंभू मारुती मंदिर पाण्याखाली
बेळगाव जिह्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या कणकुंबी भागात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होत असल्याने हब्बनहट्टी येथे मलप्रभा नदीत असलेले श्री स्वयंभू मारुती मंदिर पाण्याखाली गेले आहे. कणकुंबी भागात गेल्या दोन दिवसापासून संततधार पाऊस असल्याने परिसरातील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. तसेच चिगुळे, पारवाड, चिखले, बेटणे आदी परिसरातील लहान-मोठे धबधबे पर्यटकांना आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहेत. वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी बेळगाव परिसरांमधून अनेक पर्यटक दररोज कणकुंबी भागात येत असून पावसाचा मनसोक्त आनंद लुटत आहेत. मात्र जांबोटी कणकुंबी भागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजा सुखावला असून रोप लागवडीच्या कामामध्ये व्यस्त आहे. या भागातील शेतकऱ्यांना भाताची नटी लावण्याची धांदल सुरू असून शेतात काम करण्यासाठी माणसे मिळणे कठीण झाले आहे. यावर्षी पहिल्यांदाच संततधार पावसामुळे नदीला पूर आला आहे. हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू मारुती मंदिराच्या स्लॅबपर्यंत पहिल्यांदाच एव्हढे पाणी आले आहे. मंगळवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अर्धे अधिक मंदिर पाण्याखाली गेले आहे.









