वार्ताहर/उचगाव
उचगाव परिसराला सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमाराला वळिवच्या जोरदार पावसाने झोडपून काढले. मुसळधार वृष्टी आणि गारासह सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. शेतवडीमध्ये पाणी साचल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत होते. जोरदार वाऱ्याच्या आणि पावसाच्या तडाख्याने आंबा, काजू, मुरठे पडून बागायतदारांचेही मोठे नुकसान झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत होते. सोमवारी सकाळपासूनच उष्णतेचा कहर झाला होता. सगळीकडे लाहीलाही होत असतानाच सायंकाळी पाचच्या सुमाराला वादळी वारा आणि गारासह मुसळधार पावसाने झोडपल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे तसेच शेतवडीतील झाडांच्या अनेक फांद्या कोसळल्याचेही दिसून येत होते. ग्रामपंचायतीने गटारींची स्वच्छता न केल्याने रस्त्यांच्या दुतर्फा साचलेल्या गाळ, माती, दगड यामुळे गटारीतील पाणी न गेल्याने सर्वत्र पाणी तुंबून अनेक ठिकाणी घरातूनही पाणी शिरल्याचे चित्र दिसून येत होते. या भागात हा दुसऱ्यांदा वळिवाचा जोरदार पाऊस झाला. शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतीक्षेत असतानाच मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने ऊस, मिरची आणि इतर भाजीपाला पिकांना पोषक ठरला आहे. वळीव पाऊस झाल्याने जमिनीची मशागत करण्यासाठी आता शेतकरी वर्गाला सोपे झाले आहे.









