बैठे विक्रेत्यांची तारांबळ : हवेत गारवा : काही भागात वीजपुरवठा खंडित
बेळगाव : शहरासह पश्चिम भागाला पावसाने मंगळवारी सायंकाळी झोडपून काढले. ढगांचा गडगडाटासह पाऊस अधुनमधून सुऊ होता. सायंकाळी 7 च्या सुमारास जोरदार सरीने पावसाला सुऊवात झाली. त्यानंतरही जोर वाढतच राहिला. अनगोळ, वडगाव, शहापूर, खासबाग, पिरनवाडी, मच्छे, धामणे, सावगाव भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली. हवेत पुन्हा गारवा निर्माण झाला. काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. 2 ऑगस्टपासून आश्लेषाचा पाऊस दाखल झाला आहे. या नक्षत्रात पहिले तीन दिवस कोरडे गेले तरी चौथ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. सध्या सणासुदीचे दिवस असून बाजारात व्यापाऱ्यांबरोबर ग्राहकांचीही खरेदीसाठी गर्दी होत आहे. मंगळवारी व्यापाऱ्यांचा सुटीचा दिवस असला तरी बैठे विक्रेते बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. सायंकाळी जोरदार पाऊस सुरू झाल्याने बैठे विक्रेत्यांची तारांबळ उडाली. ग्राहकांनी कशीबशी घराची वाट धरल्याने काही वेळात रस्त्यांवरील वर्दळ पूर्णपणे कमी झाली.रात्री दहापर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या.









