हवामानात बदल : दैनंदिन जीवन विस्कळीत, शेती पिकांना फटका
बेळगाव : ढगाळ वातावरण निर्माण होऊन रविवारी शहर परिसरात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. जोरदार सरीने सर्वत्र पाणीच पाणी झाले. दुपारी अचानक आलेल्या पावसाने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांसह ग्राहकांचीही तारांबळ उडाली. रविवारी सुटीचा दिवस असल्याने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचाही हिरमोड झाला. ऐन हिवाळ्यात पडत असलेल्या या पावसाने मात्र शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. मागील आठ-दहा दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. ढगाळ वातावरण निर्माण होऊन कमी-जास्त प्रमाणात पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. काही ठिकाणी शिडकावाही पहावयास मिळत आहे. मात्र ऐन हिवाळ्यात पडत असलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. फेंगल चक्री वादळामुळे पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार चार दिवसांपासून कमी जास्त प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत आहेत. रविवारी दुपारी आलेल्या अचानक पावसामुळे व्यापारी वर्ग आणि खरेदीसाठी बाजारात आलेल्या नागरिकांचीही तारांबळ उडाली. विशेषत: बैठ्या विक्रेत्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला.
गटारी तुंबून पाणी बाहेर
शनिवारी व रविवारी झालेल्या पावसाने गटारी तुंबून पाणी रस्त्यावर आले. दुर्गंधीयुक्त पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागली. शिवाय गटारीतील कचऱ्याचा प्रश्नही हिवाळ्यात ऐरणीवर आला आहे. नाले आणि गटारी स्वच्छता केली जात नसल्याने पावसात अडचणी येऊ लागल्या आहेत.
ऐन सुगी हंगामात पावसाचा व्यत्यय
ऐन सुगी हंगामात सुरू असलेल्या कमी जास्त पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. सुगी हंगाम लांबणीवर पडत असल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे. तर या पावसाने भात आणि इतर पिकेही भुईसपाट झाली आहेत. त्याबरोबर रब्बी हंगामातील पेरणी आणि लागवडही खोळंबली आहे.
गांधीनगर ब्रिजजवळ पाणी निचऱ्याचा प्रश्न कायम
शनिवारी झालेल्या पावसामुळे जुने गांधीनगर येथील ब्रिजजवळ पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होऊन वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. पाऊस झाला की गांधीनगर ब्रिजखाली पाण्याचा निचरा होत नाही. पाणी तुंबून राहत असल्याने ये-जा करणे अडचणीचे ठरू लागले आहे. परिणामी वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ लागली आहे.









