वार्ताहर / तुडये
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय परिसरात शनिवारी सायंकाळी 5 ते रात्री 8 पर्यंत वळीव पावसाने जोर कायम ठेवल्याने पाणीसाठ्यात नाममात्र वाढ होणार आहे.
यावर्षी जलाशय परिसरात वळीव पावसाने हुलकावणी दिली होती. जानेवारी महिन्यापासून केवळ 30 मि.मी. पाऊस झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी या परिसरात तुरळक असा 1.8 मि.मी. पाऊस झाला. मात्र सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस झाल्याने पाणीपातळी वाढण्यास फायदेशीर ठरणार आहे.
शनिवारी सकाळी जलाशयाची पाणीपातळी 2455.95 फूट इतकी होती.
अजून आठ फूट पाणीसाठा जलाशयात शिल्लक आहे. यावर्षी बेळगाव शहराला पाणीटंचाईची समस्या जाणवणार नाही.
आठ फूट वापरण्यास उपलब्ध असलेले पाणी, तसेच डेडस्टॉकमधील सात-आठ फूट पाणी शहराला दोन महिने नक्कीच पुरणारे आहे.
एप्रिल महिन्यात शहराला साडेचार फूट पाणी वापर
एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी (01/04/2024 रोजी) जलाशयाची पाणीपातळी 2462.00 इतकी होती.
महिनाभरात केवळ साडेचार फूट पाणीसाठा बेळगाव शहराला सोडण्यात आला आहे. मागील दोन वर्षे पाणीसाठा समाधानकारक आहे. त्यामुळे डेडस्टॉकमधील पाणी उपसा करण्यात आला नाही.
बेळगाव शहराला पाणीपुरवठा हा काही वॉर्डातून मुबलक तर बऱ्याच ठिकाणी आठ-पंधरा दिवसांतून करण्यात येतो.









