बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसाचा राज्यात जोर वाढणार आहे. पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईत 7 आणि 8 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज तर 9 आणि 10 ऑगस्ट रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच कोकण, महाराष्ट्र, गुजरात आणि आसपासच्या राज्यांसह मध्य भारतातील काही भागांमध्ये तीव्र वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवरील मच्छिमारांना देखील इशारा देण्यात आला आहे.
गेल्या १० ते १२ दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा एंट्री केली आहे. आज सकाळपासूनच पावसाचा जोर कायम आहे. तर कोकणात पावसाने जोरदार बॅटींग केली आहे. सततच्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामध्ये कोतळूक कासारी नदी प्रथमच पात्राबाहेर आली आहे. नदीलगतची भातशेती पाण्याखाली गेली आहे. आरे येथेही पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे.सततच्या पावसामुळे असगोली (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) गावाजवळ भात शेतीमध्ये पाणी शिरलं आहे. तसेच पुलावर पाणी असल्याने वाहतूक बंद आहे.
Previous ArticleKarnatak; पुनीत राजकुमारला ‘कर्नाटक रत्न’ पुरस्कार 1 नोव्हेंबरला
Next Article अनिता मडगावकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन








