पुणे / प्रतिनिधी :
राज्यात मान्सून सक्रिय झाल्याने दमदार पावसास सुरुवात झाली असून, शुक्रवारी कोकण गोवा तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हय़ांना मुसळधार पावसाने झोडपले. विदर्भ व मराठवाडय़ातही जोरदार पाऊस झाल्याने पाणीसाठय़ात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.
दक्षिणपूर्व मध्य प्रदेशवर सध्या हवेची द्रोणीय स्थिती आहे. याबरोबरच अरबी समुद्रावरुन येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांची तीव्रता वाढल्याने राज्यभर पाऊस होत आहे. कोकण तसेच मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांत रात्रीपासूनच मुसळधार पावसास सुरुवात झाली. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्हय़ातील काही भागांत मुसळधार, तर नाशिक, पुणे, साताऱ्यातील घाटक्षेत्रात तसेच अनेक भागाला मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे जनजीवन मोठय़ा प्रमाणात विस्कळीत झाले. सखल भागात पाणी साठले, तर वाहतुकीसही अडथळा निर्माण झाला. ग्रामीण भागात दमदार पावसामुळे शेतीला संजीवनी मिळाली आहे.
पाणीसाठय़ात वाढ
धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे राज्याच्या पाणीसाठय़ात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून, हा साठा 71 टक्क्यांवर पोहोचला आहे. अनेक धरणातून शुक्रवारी पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेची सूचना देण्यात आली आहे. मावळ, मुळशी तालुक्यातील धरणे ओव्हरफ्लो झाली असून, या भागात पर्यटकांनी पुन्हा गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
तीन दिवस पाऊस
कोकणात 11 सप्टेंबरपर्यंत पावसाचा प्रभाव राहणार असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात पुढील तीन दिवस यलो अलर्ट असून, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दोन आठवडय़ांचा अंदाज
हवामान विभागाने शुक्रवारी 8 ते 14 सप्टेंबर तसेच 15 ते 21 सप्टेंबर या पुढील दोन आठवडय़ांचा पावसाचा अंदाज वर्तविला असून, यानुसार कोकण गोवा तसेच विदर्भात चांगला पाऊस राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.








