कणकुंबी येथे 1261 मि. मी. पावसाची नोंद : धबधबे झाले प्रवाहित
वार्ताहर /कणकुंबी
कणकुंबी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून मलप्रभा नदी तसेच सर्व नाले ओसंडून वाहत आहेत. बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत कणकुंबी पर्जन्यमापक केंद्रात 1261.6 मि. मी. इतकी पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात 814.2 मि. मी. पाऊस झालेला असून जुलै महिन्यात गेल्या चार दिवसात 447.4 मि. मी. पाऊस झाला आहे. सद्यस्थितीत या भागात पावसाने हाहाकार माजवलेला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. पारवाड, चिगुळे व इतर काही गावांमध्ये घरांची पडझड झाली आहे.
कणकुंबी आणि परिसरातील नागरिकांना अद्यापही विजेच्या लपंडावाला सामोरे जावे लागत आहे. या भागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे चिखले, पारवाड, सुरल, चिगुळे, माण, हुळंद व चोर्ला आदी गावातील धबधबे प्रवाहित झाले असून वनखात्याने बंदी घातल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. सध्या माण येथील सिंबोली धबधबा, सुरल येथील लाडकीचा धबधबा व चिखले पारवाड दरम्यान असलेला सवतुरा धबधबा ओसंडून वाहत आहेत. कणकुंबी आणि परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने जोर घेतलेला असून जूनपासून अद्याप 1261 मि. मी.पाऊस झाल्याची नोंद कणकुंबी पर्जन्यमापक केंद्रात झाली आहे.









