पावसामुळे सारेच झाले हतबल : शेतकरी हताश, बाजारपेठेवरही परिणाम
प्रतिनिधी / बेळगाव
पावसाने अक्षरशः साऱयांनाच नकोसे करून सोडले आहे. दररोज जोरदार पाऊस येत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. महत्त्वाचे म्हणजे हातातोंडाला आलेली पिके वाया जाऊ लागली आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. ‘बस कर रे बाबा’ असे आता सारेजण म्हणू लागले आहेत. मात्र पाऊस काही विश्रांती घ्यायला तयार नाही. सोमवारीही दुपारीच पावसाने शहराला झोडपून काढले. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. यामुळे साऱयांचीच तारांबळ उडाली होती.
गेल्या काही वर्षांपासून बारमाही पाऊस पडत आहे. पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा असे ऋतू असताना आता वर्षभर पाऊस पडत असल्याने थंडी गायब होते तर उन्हाळाही अचानक तडाखा देऊन गायब होताना दिसत आहे. या बदलत्या हवामानामुळे वेगवेगळय़ा चर्चाही रंगू लागल्या आहेत. ऑक्टोबरपासून थंडीची चाहूल लागते. मात्र पाऊसच जायला तयार नाही. त्यामुळे यावषी थंडी केव्हा सुरू होणार? याचाच विचार करावा लागत आहे.
रविवारी ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. येळ्ळूरला तर अक्षरशः ढगफुटी झाल्यासारखा पाऊस कोसळला. या पावसाने अनेकांच्या घरात पाणी शिरले. तर हातातोंडाला आलेले भातपीक भुईसपाट झाले. यामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे. निसर्गापुढे शेतकऱयाने हात टेकले असून आता आम्ही कोणते पीक घेऊ, असे शेतकरी म्हणू लागला आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना अशा प्रकारे निसर्गाचा फटका दरवर्षीच बसू लागला आहे. त्यामुळे शेती नकोच म्हणण्याची वेळ शेतकऱयांवर येऊन ठेपली आहे.
शहरामध्ये सुरू असलेल्या या पावसाने दिवाळी सणाच्या बाजारहाटसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडवून दिली. त्यामुळे बाजारपेठेवरही त्याचा परिणाम दिसून आला. दिवाळी सणासाठी अनेकांनी दुकाने तसेच दुकानांसमोर विविध वस्तू मांडून ठेवल्या होत्या. मात्र या पावसाने त्यांचीही चांगलीच फजिती उडविली. ऐन सणाच्या दिवसांतच पावसाला सुरुवात झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.









