पुढील पाच दिवस पावसाचेच राहणार
पणजी : सोमवारी पुन्हा एकदा पावसाने जोर धरला. गोव्याच्या विविध भागात सायंकाळी उशिरा पाऊस पडल्याचे वृत्त आहे. यावर्षी पावसाचा मुक्काम गोव्यात वाढला असून पुढील पाच दिवस पावसाचे असणार, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. रविवारी गोव्यातील बहुतेक भागात पाऊस पडला नाही. थर सोमवारी सकाळपासून कडकडीत ऊन पडले होते, मात्र दुपारनंतर ढग दाटून आले आणि सायंकाळी वाळपई, सांखळी, डिचोली, माशेल, आमोना, फोंडा, पणजी, म्हापसा, धारबांदोडा व दक्षिण गोव्यातील बऱ्याच भागात मध्यम तथा जोरदार पाऊस पडला. पणजीत सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत चालूच होता.
हवामान खात्याने गोव्यात सर्वत्र मध्यम तथा हलक्या स्वरूपात पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. 7 नोव्हेंबर रोजी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करून यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या 24 तासात पावसाची कोणतीही नोंद झालेली नाही. संपूर्ण गोव्यात रविवारी पावसाचा एकही थेंब पडला नाही. मात्र सोमवारी सायंकाळी उशिरा पावसाची रिपरिप सुरू झाली. दि. 5 रोजी त्रिपुरी पौर्णिमा असून त्या दिवसापासून गोव्यातील जत्रोत्सवांना प्रारंभ होतो. त्यामुळे यंदा 15 नोव्हेंबर पर्यंतच्या जत्रांवर पावसाचे पाणी पडण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी तुळशीविवाह सोहळ्यातही व्यत्यय आला. काहीनी ताडपत्री तसेच मिळेल तो आधार घेऊन तुळशीविवाह सोहळा उरकून घेतला.









