वळीव समाधानकारक : काहीअंशी पाण्याचा प्रश्न निकाली : जनावरांनाही दिलासा
बेळगाव : यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वत्र पाणीटंचाई गंभीर बनली आहे. बारा तालुक्यातील 111 गावांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. अशा परिस्थितीत वळीव बरसल्याने काहीअंशी पाणीटंचाई दूर झाली आहे. मागील पंधरा दिवसात 43.91 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पाणीसमस्या दूर होण्यास काहीशी मदत झाली आहे. गतवर्षी पावसाळ्यात म्हणावा तसा पाऊस बरसला नाही. त्यामुळे डिसेंबरपासूनच पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. जलाशये, नदी, तलाव आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत घट झाली होती. मात्र, मागील पंधरा दिवसात अधूनमधून वादळी पाऊस झाल्याने काही प्रमाणात पाण्याची पातळी वाढली आहे. तसेच सध्या वळीव होत असल्याने पाणीसमस्या दूर होऊ लागली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल आणि राकसकोप जलाशयांच्या पाणीपातळीतही घट झाली होती. त्यामुळे एल अँड टीकडून पाणी बचतीसाठी आवाहन केले जात आहे. हिडकल जलाशयाचे पाणी संकेश्वर, हुक्केरी आणि बेळगाव शहरांना सोडले जाते. राकसकोप जलाशयाचे पाणी केवळ बेळगाव शहरालाच पुरविले जाते. मात्र, दोन्ही जलाशयांच्या पाणीपातळीत घट झाल्याने शहराला आठ दिवसाआड पाण्याचा पुरवठा होत आहे.
ग्रामीण भागातही पाणीसमस्या गंभीर बनली होती. पिण्याबरोबर जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही बिकट बनला होता. नदी-नाले आणि तलाव आटल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, आता वळीव पाऊस समाधानकारक झाल्याने काहीअंशी पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. विशेषत: वळिवाने माळरानावर ओल्या चाऱ्याची उगवण होऊ लागली आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न दूर झाला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील अथणी, हुक्केरी आणि चिकोडी तालुक्यातील काही भागात चारा बँक सुरू करण्यात आल्या होत्या. धनगर समाजाच्या शेळ्या-मेंढ्यांना चाऱ्यासाठी रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली होती. काही वेळा झाडाचा पाला काढून गुजराण करावी लागत होती. मात्र, आता जिल्ह्यात सर्वत्र वळीव पाऊस झाल्याने रानोमाळ नवीन चाऱ्याची उगवण होत आहे. त्यामुळे शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्याचा प्रश्नही मिटला आहे.









