हवामान खात्याकडून जोरदार पावसाचा इशारा : विशाखापट्टणम् भागात कमी दाबाचा पट्टा,ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा 7 टक्क्यांहून जास्त पाऊस,गोव्यात आतापर्यंत यंदा 113.3 इंच पावसाची नोंद
पणजी : हवामान खात्याने पुढील पाच दिवसांसाठी ‘एलो अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे पुढील पाच ते सहा दिवस मुसळधार पावसाची शक्यता खात्याने वर्तवली आहे. ऑगस्ट महिन्यात यंदा चतुर्थी उत्सव लवकर आल्याने या उत्सवावर पावसाचा परिणाम झाला. काल रविवारी गणेशचतुर्थीच्या पाचव्या दिवशी दिवसभर पावसाने थोडी विश्रांती घेतली. दिवसभरात अधून-मधून सूर्यदर्शनही झाले. सायंकाळनंतर अनेक भागात जोरदार पाऊस झाला. गेल्या चोवीस तासांत गोव्यात सरासरी अर्धा इंच पावसाची नोंद झाली आहे. विशाखापट्टणम् येथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामान खात्याने पुढील पाच ते सहा दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
त्याच अनुषंगाने खात्याने पुढील पाच दिवस राज्यात एलो अलर्ट जारी केला आहे. यंदा ऑगस्ट महिन्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे वार्षिक सरासरीपेक्षा 7 टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यात साधारणत: सप्टेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडत असतो. त्यामुळे पावसाची टक्केवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे. यंदाच्या मोसमात ऑगस्ट महिन्यापर्यंत 113.3 इंच इतका पाऊस गोव्यात झाला आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात सर्वाधिक पाऊस धारबांदोडा तालुक्यात पडला असून, चोवीस तासांत 1.11 इंच पावसाची नोंद झाली आहे. पणजी भागात आणि काणकोण तालुक्यात सर्वाधिक कमी पाऊस पडला आहे. या दोन्ही ठिकाणी गेल्या चोवीस तांसात केवळ 0.10 इंच इतका पाऊस पडला आहे.
गेल्या चोवीस तासातील पाऊस असा (इंचात)
धारबांदोडा (1.11 इंच), म्हापसा (0.95), पेडणे (0.89), सांगे (0.71), फोंडा (0.62), मुरगाव (0.46), सांखळी (0.44), दाबोळी (0.35), जुने गोवे (0.34), केपे (0.19), पणजी (0.10), काणकोण (0.10).









