Kolhapur Rain update : कोल्हापुरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूरकरांना महापुराची धास्ती वाटत आहे. त्यातच भारतीय हवामान खात्याने सोमवारी पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. त्यामुळे कोल्हापूरवर पुन्हा एकदा महापूराची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या पंचगंगा नदी इशारा पातळी जवळून वाहत असल्याने कोणत्याही क्षणी इशारा पातळी ओलांडून जाईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. रात्री साडेनऊ वाजण्याच्या आकडेवारीनुसार पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पातळी 38.7 इंच इतकी आहे. पंचगंगेची इशारा पातळी ही 39 फूट असून धोका पातळी 43 फूट आहे.
पाणलोट आणि धरण क्षेत्रात देखील पावसाचा जोर कायम असून कोणत्याही क्षणी राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. त्याबाबतची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. सध्या राधानगरी धरण 86 टक्के भरले असून धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यातील सर्वच नद्यांनी पात्र सोडले असून अनेक मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.