राज्यात आतापर्यंत 102 इंच पाऊस : सर्वाधिक 137 इंच पाऊस वाळपईत
प्रतिनिधी /पणजी
गोव्यात सक्रिय झालेल्या मान्सूनने रविवारी रात्री झोडपून काढले. सोमवारी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या व सायंकाळी पावसाने थोडी उसंत घेतली. राज्यात आज पावसाचा जोर वाढणार असून राज्यात सर्वत्र मध्यम तथा मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
गेल्या 24 तासांत राज्याला पावसाने झोडपून काढले. रविवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. रात्रभर अनेक भागात जोरदार पाऊस पडला व पहाटे पावसाचा जोर मंदावला. राज्यातील अनेक नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आणि अनेक भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. मात्र सकाळी पावसाचा जोर काहीसा मंदावल्याने कुठेही पूर आला नाही. सध्य़ाचा पाऊस हा परतीचा पाऊस नसल्याचे हवामान खात्याने म्हटले असून मान्सून आक्रमक बनल्याचे नमूद केले आहे.
रविवारी वाळपईत 3 इंचपेक्षा जास्त पाऊस नोंद झाला. पेडणे, मडगाव व सांगे येथेही प्रत्येकी साधारणतः 3 इंचापर्यंत पाऊस झाला. सांखळी, केपे येथे प्रत्येकी 2.5 इंच पाऊस पडला. दाबोळी येथे 2 इंच झाला. फ्ढाsंडा, म्हापसा, जुनेगोवे येथे प्रत्येकी 1.5 इंच तर मुरगाव, पणजी व काणकोण येथे प्रत्येकी एक इंच पाऊस पडला.
आतापर्यंत 102 इंच पाऊस
राज्यात यंदाच्या मोसमात गेल्या 24 तासात सरांसरी दोन इंच पावसाची नोंद झाल्याने यंदाच्या मोसमात पडलेल्या पावसाची नोंद 102 इंच एवढी झाली आहे. पावसाचा मोसम येत्या 30 सप्टेंबर रोजी अधिकृतरित्या संपुष्टात येतो. त्यानंतर पडणारा पाऊस अतिरिक्त किंवा मान्सूनोत्तर पाऊस म्हणून गणला जातो. साधारणतः ऑक्टोबरमध्ये मान्सून परतीच्या वाटेला लागणार असा अंदाज आहे. यंदाचा पाऊस हा सरांसरी 8 टक्के एवढा कमी झालेला असला तरी समाधानकारक आहे व पुढील 15 दिवसात राज्यात सर्वत्र दमदार पावसाची शक्यता आहे.
सर्वाधिक 137 इंच वाळपईत
यंदाच्या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद वाळपई येथे झाली असून तेथे 137 इंच पाऊस पडला. पेडणे येथे 129 इंच, सांगे येथे 116 इंच, केपे येथे 114 इंच, काणकोण येथे 109 इंच पाऊस झाला.









