व्यापारी-नागरिकांची तारांबळ : भात पिकाला फटका तर रब्बी पिकाला पोषक
बेळगाव : बुधवारी पहाटेच शहरासह ग्रामीण भागामध्ये पावसाचे दमदार आगमन झाले. थंडीच्या दिवसांत अवेळी झालेल्या पावसामुळे साऱ्यांचीच तारांबळ उडाली. ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. या पावसामुळे भात पिकाचे नुकसान झाले. तर हा पाऊस कडधान्य पेरणीला पोषक ठरला आहे. दिवाळीच्या तोंडावरच पाऊस झाल्याने बुधवारी शहराकडे मात्र ग्रामीण भागातील जनतेने पाठ फिरविली. त्यामुळे बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीला थंडा प्रतिसाद मिळाला. पावसाच्या जोरदार आगमनामुळे साऱ्यांचीच दाणादाण उडविली. काही भागामध्ये दीड तास तर काही भागात दोन तासांपेक्षा अधिक पाऊस झाला. या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचून होते. शहरातील रस्त्यांवरही पाणी साचले होते. सकाळी 11 वाजेपर्यंत पावसाची रिपरीप सुरू होती. त्यामुळे फेरीवाले, बैठे व्यापारी आणि इतर व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली होती. शहरातील अनेक रस्त्यांवर असलेल्या सखल भागामध्ये पाणी साचून होते. थंडीच्या दिवसांत पावसाचे आगमन झाल्याने उबदार कपड्यांऐवजी रेनकोट, छत्रींचा वापर करावा लागला. दुचाकीस्वारांना त्याचा अधिक त्रास झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी दलदल निर्माण झाली होती. गटारीचे पाणीही रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे पादचाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागला. भात पिकाला फटका तर
रब्बी पिकाला पोषक
सध्या काही भागात भात कापणी सुरू आहे. यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे भात पीक खराब झाले आहे. काही प्रमाणात असलेले भात पीक शेतकरी कापत असतानाच या पावसाचे आगमन झाल्याने नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी भात कापून मळणीही घातल्या होत्या. त्यांनाही याचा फटका बसला. दुष्काळी परिस्थितीत हातातोंडाला आलेले भात पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागले आहे. भात पिकाला फटका बसला असला तरी रब्बी पिकाच्या पेरणीला हा पाऊस पोषक ठरल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पावसाने दडी मारल्यामुळे भात पीक खराब झाले. तसेच रब्बी पिकाची पेरणी करणेही अवघड झाले. भात कापणीनंतर कडधान्य पेरणी केली जाते. मात्र जमिनीमध्ये ओलावा नसल्याने समस्या निर्माण झाली होती. बुधवारी झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात पेरणी करता येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एकूणच या पावसामुळे काही पिकांचे नुकसान झाले तरी काही पिकांना पोषक वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.
मॉर्निंग वॉकर्सनाही फटका
पहाटेच ढगाळ वातावरण आणि पावसाला सुरुवात झाली. वळीव स्वरुपाचा पाऊस असल्यामुळे बाहेर पडणे कठीण झाले होते. विशेष करून मॉर्निंग वॉकर्सना घरीच रहावे लागले. छत्री, रेनकोट शोधावे लागले. विद्यार्थ्यांनाही शाळांना छत्री तसेच रेनकोट परिधान करूनच जावे लागले. एकूणच अवेळी आलेल्या या पावसामुळे साऱ्यांनाच फटका बसल्याचे दिसून आले.
वीजपुरवठा खंडित
बुधवारी सकाळी ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाल्यामुळे विद्युत पुरवठा मात्र खंडित झाला होता. सध्या दिवाळी सणासाठी फराळ करण्याच्या तयारीत असणाऱ्या महिला वर्गाला त्याचा फटका बसला. यामुळे महिलावर्गातून नाराजी व्यक्त करण्यात आली. पहाटेच वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे महिलांना घरातील कामे करणे कठीण झाले होते. बऱ्याच उशिरानंतर दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.









