मालमत्तांची हानी, शेकडो झाडे जमीनदोस्त, वनखात्याला फटका : वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे गैरसोय
बेळगाव : सोमवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे मोठा दणका बसला आहे. विशेषत: खासगी आणि सार्वजनिक मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. धोकादायक झाडे कोसळून घर, पत्रे, विद्युतखांबे, विद्युततारा आणि इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वनखात्याबरोबरच मालमत्ताधारकांना मोठा फटका बसला आहे. विशेषत: नैसर्गिक आपत्तीमुळे शेकडो झाडे कोसळली आहेत. पावसापेक्षा वाऱ्याचा वेग अधिक होता. त्यामुळे झाडे विविध ठिकाणी कलंडली आहेत. शाळा, घरे, शासकीय कार्यालये आणि इतर ठिकाणीदेखील झाडे आणि फांद्या कोसळून नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी विद्युततारांवर झाडे कोसळून हेस्कॉमलादेखील फटका बसला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रात्रभर बत्तीगुल झाली होती. शिवाय मंगळवारी सकाळीदेखील विजेचा पत्ता नव्हता. त्यामुळे दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम झाला. वनखाते दरवर्षी लाखो रोपे लावून झाडांचे संवर्धन करते. मात्र वादळी पावसामुळे झाडे कोसळून वनखात्यालादेखील फटका बसू लागला आहे. वादळी पावसाने शहरासह उपनगर आणि विविध ठिकाणी झाडे कलंडली आहेत. काही ठिकाणी फांद्या कोसळल्या आहेत. त्यामुळे खासगी मालमत्तेचेदेखील नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घर आणि छप्परावरील पत्रे उडून गेले आहेत. मागील काही दिवसांपासून उष्म्यात वाढ झाली होती. त्यामुळे वाढत्या उष्म्याने शरीराची लाहीलाही होत होती. शिवाय शेतकरीदेखील वळिवाच्या प्रतीक्षेत होते. मात्र म्हणावा तसा पाऊस झाला नाही. केवळ वादळ आणि वाऱ्याचाच वेग अधिक होता. त्यामुळे वादळाने मोठे नुकसान झाले आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक झाडे आणि फांद्या हटवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली होती. मात्र अद्याप वनखाते आणि महानगरपालिका याबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मालमत्तांचे नुकसान होऊ लागले आहे. धोकादायक झाडांचा सर्व्हे करून झाडे हटाव मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.
धोकादायक झाडे मनपाच्या सहकार्याने हटवणार
वादळी पावसामुळे बऱ्याच ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. त्यामुळे वनखात्यालादेखील फटका बसला आहे. शहरातील धोकादायक झाडांसाठी सर्व्हे हाती घेतला जाणार आहे. धोकादायक झाडे मनपाच्या सहकार्याने हटविली जाणार आहेत.
– पुरुषोत्तम रावजी (आरएफओ वनखाते)









