पैंगीण येथे इमारतीचा भाग कोसळला : सारा परिसर जलमय, सर्वांची घोर निराशा
काणकोण : काणकोणात पावसाचे थैमान चालूच असून मागच्या पाच दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गाळये, पैंगीण येथील लक्ष्मी सर्व्हिस स्टेशन इमारतीचा एक भाग कोसळण्याची दुर्घटना घडली आहे. ऐन चतुर्थीच्या दिवसांत वरुणराजा जणू काही कोपल्याप्रमाणे बरसायला लागल्यामुळे विविध भागांमध्ये काम-धंद्यानिमित्त वास्तव्य करून असलेल्या आणि आपल्या गावाकडे परतलेल्या सर्वांचीच घोर निराशा झाली. सततच्या पावसामुळे बऱ्याच जणांनी घरातच बसणे पसंत केले.
मुसळधार पावसाने कित्येक ठिकाणचा परिसर जलमय झाला, दरडी कोसळल्या तसेच वाहतुकीवर परिणाम झाला. महालवाडा, पैंगीण येथील हादी ओहोळ तुडुंब भरून वाहू लागला आहे. गुळे येथे रस्त्यावर पाणी आले असून दाभेल येथील बंधाऱ्यातील पाण्याने तसेच अर्धफोंड नदीतील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गाळये, पैंगीण येथील लक्ष्मी सर्व्हिस स्टेशनजवळ दरड कोसळल्यामुळे इमारतीचा एक भाग कोसळण्याची दुर्घटना 29 रोजी घडली. सुदैवाने गणेश चतुर्थी सणासाठी सदर सर्व्हिस स्टेशन दोन दिवसांसाठी बंद होते.
पैंगीण येथील अत्यंत जुने असलेल्या या सर्व्हिस स्टेशनमध्ये जवळजवळ सहा कामगार काम करत असून ज्या ठिकाणी यंत्रणा ठेवण्यात आलेली आहे तोच भाग कोसळला आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती करेपर्यंत सर्व्हिस स्टेशन बंद ठेवावे लागेल त्याचबरोबर काम चालू असताना जर ही दुर्घटना घडली असती, तर त्या ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती, असे मधुकर प्रभुगावकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.









