कराड / सुभाष देशमुखे :
उड्डाणपुलाच्या कामाने अगोदरच वैतागलेल्या वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांची सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आणखी फरफट वाढली आहे. सोमवार आणि मंगळवारी पावसाने चांगलाच जोर धरल्याने कराड ते नांदलापूर यादरम्यान वारंवार वाहतूक कोंडी होते. पावसाने सेवारस्त्यावर पुन्हा खड्डे पडले असून ते चुकवताना उड्डाणपुलावरून धो धो पडणाऱ्या पाण्यासह पावसाचा मारा झेलत वाहनधारकांची प्रचंड कसरत होत आहे.
कराड शहरासह परिसरात पावसाचा जोर कायम आहे. नव्या उड्डाणपुलाच्या संथ चाललेल्या कामाने अगोदरच वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पावसाच्या माऱ्याने सेवाररत्यावरील खड्यांची खोली वाढली आहे. एन. पी. फिशसमोर पावसाच्या पाण्याने मोठा डोह झाला आहे. कोल्हापूरकडून कराडकडे येताना हिंदूस्तान मार्बलपासून काही अंतरावर सेवारस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यात मोठे खड्डे असल्याने स्थानिक वाहनधारकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. कोल्हापूर नाक्यावर खड्यांची संख्या वाढली असून या परिसरात मोठी वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक कोंडी होते.
सेवारस्त्यावरील खड्ड्यांची समस्या अन् त्यातील सततच्या पावसाचे पाणी त्यामुळे वाहनधारक संताप व्यक्त करत आहे.
- डोंगराकडून येणारे पाणी सरळ घरात
मुसळधार पावसाचा जोर कायम राहिल्याने आगाशिवनगर भागात डोंगरपायथ्याला असलेल्या घरात पावसाचे पाणी घुसण्याचे प्रकार घडत आहेत. पावसाने सलग जोर धरल्यास डोंगराकडून वेगाने पाण्याचा लोंढा अनेक कॉलन्यातील रस्त्यांवरून येत असतो. गटारे तुडूंब होऊन पाण्यासह कचरा रस्त्यावर अस्ताव्यस्त होत आहे. अनेक कॉलन्यात नव्याने रस्ते झाल्याने काही घरे रस्त्याच्या उंचीपेक्षा खाली गेली आहेत. त्यामुळे अशा घरांमधे पाणी घुसत असून नागरिकांची झोप उडाली आहे.








