कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना फोटो अपलोड करण्याचे आवाहन
खानापूर : मान्सूनने पुन्हा पाठ फिरविल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यात कुठेच जोरदार पाऊस झाला नसल्याने तालुक्यातील सर्व नदी-नाले अद्याप कोरडेच पडले आहेत. त्यामुळे सर्वच पिके धोक्यात आली आहेत. जर मान्सून आणखीन आठ दिवस अशापद्धतीने लांबल्यास तालुक्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. कृषी खात्याने पिकांचा सर्व्हे करून फोटो पाठवण्याचे आवाहन केले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्नाटक सरकारचे फॉर्मर अॅप डाऊनलोड करून आपल्या शेताचे फोटो या अॅपवर अपलोड करावेत, अन्यथा पीक संरक्षण विमा मिळणार नाही. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी कर्नाटक सरकारचे फॉर्मर अॅप तातडीने डाऊनलोड करून फोटो अपलोड करावेत, असे आवाहन कृषी खात्याचे तालुका निर्वाहक अधिकारी डी. बी. चव्हाण यांनी केले आहे.
नेंव्हेबरनंतर मे पर्यंत यावर्षी तालुक्यात वळीव पाऊस झाला नसल्याने खरीपाची पेरणीपूर्व मशागतीची कामे लांबली होती. मे महिन्याच्या शेवटी तालुक्यात एक-दोन साधारण वळीव पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने शेतीची मशागत करून भातपेरणी केली होती. कमी ओली भातपिकाची उगवण योग्यपद्धतीने झालेली नव्हती. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता. मात्र मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेले. तर आर्द्रा नक्षत्राचेही आठ दिवस संपले. तालुक्यात गेल्या चार दिवसांपूर्वी झालेला तुरळक पाऊस भात पिकाला जीवदान देऊन गेला. मात्र पुन्हा चार दिवस कडक ऊन पडत असल्याने भातपीक वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. तालुक्यातील सर्वच नदी-नाले कोरडे पडल्याने पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. येत्या दोन-चार दिवसात तालुक्यात जोरदार पावसाची गरज आहे. नदी नाले वाहण्यासाठी कणकुंबी, जांबोटीत किमान आठ ते दहा दिवस जोरदार पावसाची गरज आहे. त्यानंतर मलप्रभा नदीसह इतर नदी नाले वाहू लागणार आहेत. शेतकरी तसेच सर्वसामान्य जनता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आकाशात काही ठिकाणी काळे ढग दाटून येत आहेत. तसेच काहीवेळा पावसाळी सदृष्य हवामान तयार होत आहे. मात्र पाऊस पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. येत्या चार-आठ दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस होणे गरजेचे आहे. अन्यथा दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. तसेच पाऊस लांबल्यास तर शेतकऱ्यांना भात पिकांची दुबारपेरणी करावी लागणार आहे.









