तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात जोरदार मारा : इतर ठिकाणी मात्र केवळ शिडकावा : बाजारात किरकोळ विक्रेत्यांची तारांबळ
बेळगाव : मागील दोन महिन्यांपासून चातकाप्रमाणे प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी व नागरिकांना अखेर बुधवारी काहीसा दिलासा मिळाला. बेळगाव शहर तसेच तालुक्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील किरकोळ विक्रेत्यांची पावसामुळे तारांबळ उडाली. बेळगाव तालुक्यातील उत्तर व पूर्व भागात पावसाचा जोर अधिक होता तर दक्षिण व पश्चिम भागात केवळ शिडकावा झाला आहे. बुधवारी दुपारी 4 वाजता जोरदार पावसाला सुऊवात झाली. त्यानंतर अर्धातासहून अधिक वेळ पावसाचा जोर होता. जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाचे जोरदार आगमन झाले होते. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी जोरदार पाऊस झाला. जिल्हा प्रशासनाकडून कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला. मात्र यशस्वी ठरला नाही. केवळ शिडकावा होऊन पावसाने विश्रांती घेतली होती. बुधवारी मात्र परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली.
बेळगाव शहर परिसरात पावसाचा जोरदार मारा झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना आडोसा शोधावा लागला. जोरदार सरी कोसळल्याने भाजीविक्रेते व फेरीवाल्यांची गोची झाली होती. काही ठिकाणी तर पावसामुळे भाजी व इतर साहित्य वाहून गेले. बेळगाव तालुक्यातील मोजक्याच भागात हा पाऊस पडला. त्यामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील बेळगाव व खानापूर तालुका वगळता सर्वच तालुक्यांना दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे बेळगाव व खानापूर तालुक्यांनाही दुष्काळग्रस्त यादीत नमूद करण्याची मागणी होत आहे. बुधवारी पडलेला पाऊस महिन्याभरापूर्वी आठ दिवस पडला असता तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असता. सध्या बटाटा, रताळी व भुईमुगासह इतर पिके काढण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. अजूनही हा पाऊस आठ ते दहा दिवस पडल्यास सोयीचे ठरणार आहे. उत्तर भागातील कडोली, जाफरवाडी, देवगिरी, अगसगे, याचबरोबर पूर्व भागातील सांबरा व इतर ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शहरातील वडगावपर्यंत जोरदार पाऊस कोसळला. मात्र त्यापुढे येळ्ळूर, अवचारहट्टी, नंदिहळ्ळी, राजहंसगड, देसूर आदी भागात पावसाचा शिडकावाही झाला नाही. पूर्व भागातही काही ठिकाणी केवळ शिडकावा झाल्याचे सांगण्यात आले.
रस्त्यावर आले गटारीचे पाणी…
बुधवारी 4 नंतर पडलेल्या दमदार पावसामुळे शहरातील विविध ठिकाणी गटारीचे पाणी रस्त्यावर आले. रामदेव गल्ली, मारुती गल्ली, गणपत गल्ली आदी भागात गटारीतील पाणी रस्त्यांवर आल्याने नागरिकांना त्रास झाला. गटारीतील कचरा व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत होते. काही विक्रेत्यांची फळे, भाजी या पाण्यातून वाहून गेली आहेत.









