ढगफुटीनंतर दुसऱ्या दिवशीही जुनागड पाण्यात : हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्येही सतर्कतेचा इशारा
वृत्तसंस्था/ जुनागड, नवी दिल्ली
गुजरात, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीत मुसळधार पावसामुळे जनजीवन कोलमडले आहे. शनिवारी गुजरातच्या दक्षिण आणि सौराष्ट्र भागातील अनेक जिह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार अतिवृष्टी झाल्यामुळे शहरी भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. धरणे आणि नद्यांमधील पाण्याची पातळी वाढल्याने अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. याचदरम्यान जुनागड शहरात शनिवारी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे दाणादाण उडालेली आहे. रविवारी पाऊस ओसरला असला तरी जुनागड अजूनही पुराच्या पाण्यात बुडालेला आहे. अनेक ठिकाणी घरे आणि संपत्तीची बरीच पडझड झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुसळधार पावसामुळे अनेक निवासी क्षेत्रे आणि बाजारपेठा जलमय झाल्यामुळे नवसारी आणि जुनागड हे जिल्हे प्रभावित झाले आहेत. अधिकाऱ्यांनी लोकांना सावधगिरी बाळगण्याची विनंती केली असून कोणतीही अप्रिय घटना किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. लोकांना धरणे आणि आजूबाजूच्या परिसरात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. सखल भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी बचाव पथकांना काम देण्यात आले आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीच्या एलजी आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली.
जुनागडमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. शहरातील अनेक रस्ते पाण्याने तुडुंब भरले असून घरात अडकलेल्या लोकांना बाहेर पडता येत नाही. दोरी आणि शिडीच्या साहाय्याने लोकांना बाहेर काढले जात आहे. जुनागडमधील अनेक भागांसाठी शनिवारी झालेला मुसळधार पाऊस आपत्ती ठरला. शहरातील दुर्वेशनगर, गणेशनगर, जोशीपाडा यासह अनेक भागात शेकडो कच्च्या घरांची पडझड झाली. याठिकाणी एक मजली घरे पूर्णत: पाण्यात बुडाली असून घरातील सर्व साहित्य खराब झाले आहे. पुराच्या तडाख्यात कित्येक जनावरे वाहून गेली असून त्यांचे मृतदेहही आता सापडू लागले आहेत. जुनागडमध्ये शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जुनागड कृषी विद्यापीठाजवळील भिंत कोसळून सुरेश खिमाभाई नावाच्या 45 वषीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचवेळी भवनाथ परिसरातील गोठ्यात पुराचे पाणी शिरल्याने 30 हून अधिक जनावरे वाहून गेली.
सतर्कता आणि अलर्ट
जुनागडमध्ये सर्वत्र विध्वंसाचे दृश्य आहे. या हाहाकारामुळे जुनागडमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जुनागड शहर आणि आसपासच्या सर्व पर्यटनस्थळांवरही बंदी घालण्यात आली आहे. लोकांना धरणे आणि बंधाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्याने भावनगर, नवसारी, जुनागढ आणि वलसाडमध्ये अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर जुनागड जिह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. जामनगरमध्ये शनिवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते जलमय झाले आहेत. शहरातील अनेक सखल भागात तीन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजामुळे जिह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नोएडा-गाझियाबादमध्ये शेकडो विस्थापित
हिंडन नदीच्या पाण्याच्या पातळीने धोक्मयाचे चिन्ह ओलांडल्याने नोएडा आणि गाझियाबादमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीलगतच्या भागातून लोकांना हटवण्यात येत आहे. उत्तर प्रदेश प्रशासन लोकांना वेळीच सावध करत आहे. त्यांना सुरक्षितस्थळी नेण्यात येत आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाने यमुनेची उपनदी हिंडनला पुन्हा तडाखा बसला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पुरात सापडलेले 7 जण वाहून गेले. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांची पथके ठिकठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. पुराच्या शक्यतेमुळे हलविण्यात आलेल्या लोकांना जवळच्या शाळा, निवारा छावण्या आणि सभागृहांमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.
दिल्लीत यमुनेच्या पातळीत पुन्हा वाढ
दिल्लीतील यमुना नदीने रविवारी पुन्हा एकदा धोक्मयाचे चिन्ह ओलांडले. रविवारी सकाळी 8 वाजता जुन्या यमुना पुलावरील पाण्याची पातळी 205.9 मीटर नोंदवण्यात आली. यमुना नदीचे धोक्मयाचे चिन्ह 205.33 मीटर आहे. 13 जुलै रोजी यमुनेची पाण्याची पातळी 208.66 वर पोहोचली होती. आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वाधिक पाणीपातळी आहे. आताही दिल्लीत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाची संततधार सुरू राहिल्यास लाल किल्ल्यापासून सिव्हिल लाईन्स, आयटीओ आणि सर्वोच्च न्यायालय परिसरातही यमुनेचे पाणी पुन्हा शिरण्याची शक्यता आहे.









