‘प्रशासन तुमच्या दारात’ला साबांखा मंत्री नीलेश काब्राल यांची उपस्थिती, अधिकाऱ्यांना धरले धारेवर, अपूर्ण कामांची यादी पाठविण्याचे निर्देश
काणकोण : काणकोणात शुक्रवारी राबविण्यात आलेल्या प्रशासन जनतेच्या दारात या उपक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. काणकोणच्या प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आयोजित या उपक्रमास सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल उपस्थित होते. याशिवाय व्यासपीठावर काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर, काणकोणचे नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर, उपजिल्हाधिकारी रमेश गावकर, मामलेदार मनोज कोरगावकर, स्वयंपूर्ण मित्र विनायक वळवईकर, भाजपाचे दक्षिण गोवा सचिव सर्वानंद भगत उपस्थित होते. काणकोण पालिकेचे नगरसेवक, पैंगीण, लोलये, आगोंद, श्रीस्थळ, खोतीगाव, गावडोंगरी पंचायतींचे पंच, सरपंच आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या मतदारसंघात सर्वत्र भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या सर्वच लोकप्रतिनिधींनी यावेळी मांडली. कित्येक ठिकाणच्या जलवाहिन्या फुटलेल्या आहेत. मागच्या 26 वर्षांत या जलवाहिन्या बदलण्यात आलेल्या नाहीत. पालिका क्षेत्रात बऱ्याच ठिकाणी नियमित पाणी मिळत नाही. मास्तीमळसारख्या भागात मध्यरात्री दीड वाजता पाणी सोडण्यात येते आणि सकाळी 6 वा. बंद करण्यात येते. खोतीगाव पंचायत क्षेत्रात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. गावडोंगरी पंचायत क्षेत्रात दोन दिवसांतून एकदा पाणी पोहोचविण्यात येते. काही ठिकाणच्या पाण्याच्या टाक्या कित्येक वर्षांपासून साफ करण्यात आलेल्या नाहीत, अशा समस्या यावेळी मांडण्यात आल्या.
लोलये पंचायत क्षेत्रात विहिरी आटल्या आहेत. पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत, मात्र कमी दाबामुळे पाणी मिळत नाही. पैंगीण पंचायत क्षेत्रात जलवाहिन्या कमी दाबाच्या क्षमतेच्या बसविण्यात आल्या आहेत. निविदा मंजूर झालेली असूनही जलकुंभ उभारला जात नाही. फुटलेल्या जलवाहिन्या दुरुस्त करण्यात आलेल्या नाहीत. हत्तीपावल भागात दोन दिवसांतून एकदाच केवळ एक तास पाणी सोडले जाते. आगोंद पंचायतीमध्ये दोन दिवसांआड एकदा किंवा केवळ दोन तासांसाठी पाणी सोडले जाते, अशा अनेक समस्या यावेळी मांडण्यात आल्या. नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर, नगरसेवक हेमंत ना. गावकर, धीरज गावकर, शुभम कोमरपंत, सायमन रिबेलो तसेच दिवाकर पागी, किशोर शेट, विशाल देसाई, आगोंदच्या सरपंच फातिमा रॉड्रिग्स, लोलयेच्या सरपंचा प्रतिजा बांदेकर, पैंगीणच्या सरपंच सविता तवडकर, पंच सतीश पैंगीणकर, शिल्पा प्रभुगावकर, प्रवीर भंडारी, गावडोंगरीच्या उपसरपंच सलोनी गावकर, खोतीगावचे सरपंच आनंदू देसाई, श्रीस्थळच्या सरपंच सेलजा गावकर, रामू नाईक, गणेश गावकर, राजेश वेळीप, अक्षदा वेळीप, ज्येष्ठ नागरिक नाटिविदाद डिसा, रमेश देसाई, फा. डॉमनिक, शंकर नाईक, विकास प्रभू आणि अन्य नागरिकांनी या समस्या मांडल्या.
आठ दिवसांत समस्या निवारण्याचे आश्वासन
लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्त्याची अर्धवट कामे यासंबंधीच्या समस्या मांडल्यानंतर मंत्री काब्राल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि काही समस्या अवघ्या आठ दिवसांत दूर केल्या जातील असे आश्वासन दिले. सभापती तवडकर यांनी तर हे अधिकारी काम करायला तयार नसतील, तर त्यांना इतरत्र पाठवावे, असा सल्ला दिला.
करमल घाटातील धोकादायक वळणे कापावीत
करमल घाटातील रस्ता केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असला, तरी या रस्त्यावरील धोकादायक वळणे त्वरित कापण्यात यावीत, अशी मागणी यावेळी सभापती तवडकर यांनी केली. नगर्से ते चापोली रस्ता, चावडी ते राजबाग-तारीर, पणसुले, मणगण रस्त्यांची दुरुस्ती, पाळोळे रस्त्याचे रूंदीकरण, दिडके तारीवर नवा पूल, सादोळशेत संरक्षक भिंत आणि रस्ता, मामलेदार कार्यालयासमोरच्या नाल्याची दुरुस्ती, कर्वे येथील गतिरोधक हटविणे, ज्या ज्या ठिकाणी धोकादायक वळणे आहेत त्या ठिकाणचा रस्ता निर्धोक करणे, खोतीगाव पंचायत क्षेत्रात आवळी, नडके, येडा येथे रस्त्याची उभारणी करणे, गावणे धरणातील पाण्याचा पुरवठा त्वरित सुरू करणे अशा अनेक मागण्या यावेळी नागरिकांनी केल्या.
आठ दिवसांत माहिती देण्याचे निर्देश
जे रस्ते सरकारच्या मालकीचे आहेत त्यांच्या बाबतीत एखादी तिऱ्हाईत व्यक्ती जर अडथळे आणत असेल, तर सरळ उपजिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार नोंदवावी आणि असे प्रश्न त्वरित सोडविण्यात यावेत. बरेच ठेकेदार कामचुकारपणा करतात, त्याने सरकारचे नाव खराब होत असते. याची नोंद घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. जी कामे अपूर्णावस्थेत आहेत त्यांची यादी तयार करतानाच कारणे नमूद करून आठ दिवसांत सर्व माहिती आपल्याला पुरवावी, असे निर्देश यावेळी काब्राल यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी वीज, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा, रस्ता, इमारत विभागांचे तसेच जलस्रोत खात्याचे कार्यकारी अभियंता, साहाय्यक अभियंते, कनिष्ठ अभियंते आणि गटविकास अधिकारी, मामलेदार, उपजिल्हाधिकारी कार्यालयांतील कर्मचारी उपस्थित होते श्रीस्थळ पंचायत क्षेत्रातील विजेचा प्रश्न त्वरित सोडविल्याबद्दल श्रीस्थळ पंचायत सदस्यांनी आणि खोतीगाव पंचायतीमध्ये रस्त्यांचे डांबरीकरण हातात घेतल्याबद्दल संबंधित पंचायत मंडळाने यावेळी मंत्री काब्राल यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. संध्याकाळच्या सत्रात काब्राल यांनी श्रीस्थळ पंचायत क्षेत्रात सुरू असलेल्या काही रस्त्यांच्या कामांची पाहणी केली, श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन मंदिराला भेट दिली. तसेच सादोळशे येथील दिडके तारीवरील पदपुलाची पाहणी केली. मीटर रिडर म्ह्णून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘बीएलओ’ची अतिरिक्त जबाबदारी देण्यात येत असते. त्यामुळे वेळेवर पाण्याची बिले मिळत नाहीत. 5 व 10 रुपयांचे शुल्क फेडणे राहिले, तरी पूर्वसूचना न देता पाण्याचे कनेक्शन तोडले जाते, अशा कैफियती यावेळी नागरिकांनी मांडल्या. 24 तास सोडाच निदान 12 तास तरी पाणी द्या आणि वेळेवर पाण्याची बिले पुरवा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.









