उत्पादनापेक्षा खर्च अधिक झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात : बीन्स, कोथिंबीरच्या दरात वाढ
वार्ताहर/किणये
गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार मान्सूनपूर्व पावसामुळे तालुक्यातील भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. गवार, बीन्स, मिरची कोथिंबीर आदी पिकांचे नुकसान झाले आहे. या भाजीपाला पिकांची काढणी सुरू होती. मात्र या कालावधीतच जोरदार मान्सून पाऊस झाला. त्यामुळे भाजीपाल्याची रोपटे पूर्णपणे आडवी झाली. तालुक्याच्या विविध गावातील शेतकऱ्यांनी यंदा मिरची व बिन्स पीक मोठ्या प्रमाणात घेतली आहेत. शिवारात आडवी उभी नांगरण करून छोटे छोटे बांध तयार करून त्यावर मल्चिंग पेपर घालण्यात आला आहे. यावर एक ते दीड फुटाला एक या प्रमाणे बीन्स व मिरची रोपट्याची लागवड करण्यात आलेली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी या आधुनिक पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. बीन्स व मिरची पिके बऱ्यापैकी बहरुन आली होती. त्याची काढणी सुरू होते. मात्र या कालावधीतच मुसळधार मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आणि पिकांचे नुकसान झाले आहे. उत्पादनासाठी खर्चही अधिक प्रमाणात केलेला आहे. पिकाचे नुकसान झाल्यामुळे खर्च व उत्पन्न याचे गणित कोलमडले आहे.
हाता तोंडाला आलेली पिके भूईसपाट
याचबरोबर गवार, प्लॉवर, कोबी, बीन्स, ढबू मिरची, टोमॅटो व कोथिंबीर आदींचीही लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. उन्हाळ्यात भाजीपाला विक्री करून अनेक शेतकरी आपला उदरनिर्वाह करतात. पावसाने हाता तोंडाला आलेली पिके भूईसपाट झाली आहेत.
पावसामुळे दरात वाढ
बुधवारी बेळगावच्या मार्केट यार्डमध्ये 10 किलो गवार 200 ते 250 रुपये, दहा किलो बीन्स 500 ते 600 रुपये, दहा किलो मिरची 250 ते 300, कोथिंबीर 150 ते 200 रुपये दहा पेंडी असा दर होता. पावसामुळे बीन्स व कोथिंबीरच्या दरात वाढ झाली आहे.









