शेतकरी बनला चिंताग्रस्त : भरपाई न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा
वार्ताहर/गुंजी
जटगे येथे गवीरेड्याकडून सतत भात पिकाचे नुकसान होत असून येथील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला आहे. या भागात गवीरेड्यानी नेहमीच हैदोस घालत असून वेगवेगळ्या भागातील शेतामध्ये घुसून भात पिकाचे खाऊन तुडवून प्रचंड नुकसान करीत आहेत. त्याचबरोबर सध्या या भागात जोरदार पाऊस सुरू असून शेतवडीत गवीरेडे शिरत असल्याने त्यांच्या वजनदार पायांमुळे शेतातील बांध फुटूनही शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले आहे. येथील शेतकरी चंद्रकांत पाटील, यादव पाटील, वामन लोटुलकर, नागो नांदोडकर, विष्णू नांदोडकर, महाबळेश्वर पाटील, बाळाप्पा पाटील, पुंडलिक पाटील, गोपाळ मळीक, कल्लाप्पा मळीक, महाबळेश्वर तिनेकर, कृष्णाजी लोटूलकर, योगेश हलशीकर आदी शेतकऱ्यांच्या भात पिकाचे गवीरेड्याच्या कळपाने मोठे नुकसान केले आहे. तरी लोंढा वन विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित शेतकऱ्यांना त्वरित योग्य ती भरपाई द्यावी, अन्यथा येथील ग्रामपंचायत सदस्य सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली संबंधित शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.









