शेतकरी हवालदिल : शासनाची तुटपुंजी मदत, वनखात्याकडून हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी
खानापूर : हलगा-मेरडा परिसरात बुधवार दि. 22 रोजी रात्री हत्तींच्या कळपाने हैदोस घातला असून हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडीचशे पोती भाताची नासाडी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वनखात्याने या हत्तीच्या कळपांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. दांडेली जंगलातून दहा हत्तींचा कळप गेल्या दोन दिवसांपासून नागरगाळी विभागातील हलगा, मेरडा परिसरात आला असून या कळपात दोन लहान पिल्लांचाही समावेश आहे. या हत्तीच्या कळपाने हलगा येथील डी. एम. गुरव, नारायण रुपण, व्यकांप्पा रुपण, होन्नाप्पा पाटील, महाबळेश्वर पाटील, पुंडलिक फठाणसह इतर काही शेतकऱ्यांच्या भात पिकाचे तसेच वळी घातलेल्या भात पिकाचे खाऊन, धुडगूस घालून नुकसान केले आहे. यात सुमारे अडीचशे पोती भात वाया गेले आहे.
कळपात लहान पिल्ले असल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. हत्तीना पिटाळून लावण्यासाठी शेतकरी काही उपाययोजना करतात. मात्र लहान पिल्ले असल्याने हत्ती आक्रमक होऊन शेतकऱ्यांवर चाल करून येतो. त्यामुळे शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली आहे. यावर्षी पावसाळा कमी झाल्याने पीक जेमतेम आहे. सध्या भात कापणीचा हंगाम असताना हत्तींचा कळप आल्याने शेतकऱ्यांचे तेंडचे पाणी पळाले आहे. हातातोंडाशी आलेले भात पीकही वाया जाणार आहे. यासाठी वनखात्याने तातडीने हत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. वनखात्याकडून भरपाई तुटपुंजी देण्यात येत असल्याने शेतकऱ्यालाही नुकसानभरपाई नकोशी झाली आहे. याबाबत नागरगाळी वनविभागाचे वनाधिकारी प्रशांत जैन यांना विचारले असता हत्तींचा कळप दांडेली जंगलातून आल्याने तेथे परत पाठवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. याबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.









