बजरंग पुनिया, विनेश-संगिता फोगट, साक्षी मलिक ताब्यात : देशभरात उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीमध्ये सुऊ असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनात रविवारी गोंधळ निर्माण झाला. दिल्लीच्या जंतर-मंतर येथून नवीन संसदेसमोर महापंचायत भरवायला निघालेल्या पैलवानांना पोलिसांनी अडवल्यानंतर पोलीस आणि आंदोलक पैलवानांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यानंतर पोलिसांनी पैलवानांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याने विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंनी रविवारी सकाळी नवीन संसद भवनाकडे मोर्चा वळवला. पोलिसांनी रोखल्यानंतर कुस्तीपटू केरळ हाऊसजवळ ठिय्या मांडून बसले होते. येथून संसद भवन हाकेच्या अंतरावर आहे. तत्पूर्वी कुस्तीपटू दोन अडथळे पार करून येथे पोहोचले. कुस्तीपटू नव्या संसदेला घेराव घालण्याच्या तयारीत होते. मात्र, त्यांना अटकाव करण्यात आला. बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या पैलवानांनी आंदोलन पुकारले आहे. महिनाभरापासून कुस्तीपटूंचे आंदोलन सुऊ आहे. 23 मे रोजी दिल्लीत इंडिया गेटवर कँडल मार्च काढल्यानंतर आता महिला पंचायतच्या तयारीला वेग आला आहे. यामध्ये मोठ्या संख्येने सामील होण्यासाठी कुस्तीपटूंनी लोकांना आवाहन केले आहे.
नवीन संसद भवनासमोर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये रविवारी जोरदार संघर्ष झाला. बॅरिकेड्स ओलांडून पैलवान नवीन संसदेच्या दिशेने जात होते. पोलिसांनी त्यांना थांबवून बजरंग पुनिया, विनेश-संगिता फोगट, साक्षी मलिक आणि इतरांना ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी आंदोलनस्थळ असलेल्या जंतरमंतरवरील तंबू आणि खुर्च्या हटवल्या. 34 दिवसांपासून जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू रविवारी नवीन संसदेसमोर महिला महापंचायतीत सहभागी होणार होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी या महापंचायतीला परवानगी दिली नाही. असे असतानाही पैलवानांनी महापंचायत आयोजित करून संसदेच्या दिशेने कूच करण्यास सुरूवात केल्याने त्यांना रोखण्यात आले.
हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पंजाबसह अनेक राज्यांतील शेतकरी महापंचायतीत सहभागी होणार असल्यामुळे दिल्ली पोलिसांनी सिंघू आणि टिकरी सीमेवर बॅरिकेड्स लावले होते. तसेच दिल्लीतील केंद्रीय सचिवालय आणि उद्योग भवन मेट्रो स्टेशनचे सर्व प्रवेश आणि बाहेर पडण्याचे दरवाजे बंद करण्यात आले होते. याचदरम्यान हरियाणा पोलिसांनी रविवारी सकाळी हिसार, सोनीपत, पानिपत, रोहतक, जिंद आणि अंबाला येथे खाप प्रतिनिधी आणि शेतकरी नेत्यांना ताब्यात घेतले. हरियाणातील सर्व टोलनाक्मयांवर पोलीस बंदोबस्त तैनात करून महापंचायतीकडे जाणाऱ्यांना ताब्यात घेतले. महिला महापंचायतीत हरियाणा व्यतिरिक्त उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, पंजाब आणि दिल्ली येथील खाप भागातील लोक आणि शेतकरी सहभागी होणार होते.









