इंटरनेट बंद, 150 भूमिगत तळ उद्ध्वस्त, हमासच्या हवाई दल प्रमुखाला मारल्याचाही इस्रायलचा दावा
वृत्तसंस्था/ तेल अवीव, गाझा
इस्रायलने हमास या दहशतवादी संघटनेवर मोठ्या प्रमाणावर हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांदरम्यान हवाई दलाकडून गाझावर दर मिनिटाला बॉम्बफेक सुरू असतानाच इस्रायली सैन्य हळूहळू गाझामध्ये घुसत आहे. शनिवारी तिसऱ्यांदा इस्रायलचे युद्धसज्ज रणगाडे गाझापट्टीमध्ये घुसले होते. हमासचा नायनाट करण्यासाठी इस्रायलला अनेक आठवड्यांपासून गाझावर बॉम्बस्फोट करण्याची इच्छा होती. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला करून सुमारे 1,400 लोक मारले आणि शेकडो लोकांना ओलीस ठेवल्यापासून युद्धाचा भडका उडाला आहे.
हवाई हल्ल्यांदरम्यानही हमासच्या भूमिगत तळांना खास लक्ष्य केले जात आहे. शुक्रवारी रात्री हमासच्या अशा 150 लक्ष्यांवर हल्ले करण्यात आले. त्यामुळे गाझा परिसरात संपर्क तुटला असून इंटरनेट बंद करण्यात आले आहे. जवळपास 23 लाख लोक जगापासून तुटले आहेत, असे ‘आयडीएफ’च्या प्रवक्त्याने सांगितले. हमासच्या हवाई दलाचा प्रमुख इसाम अबू ऊकबेह याचा खात्मा केला आहे, असा दावा लष्कराने केला आहे. आयडीएफच्या म्हणण्यानुसार इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबर रोजी केलेल्या पॅराग्लायडिंग हल्ल्यासाठी ऊकबेह जबाबदार होता.
इस्रायल-हमास युद्धाचा शनिवारी 22 वा दिवस होता. दरम्यान, इस्रायल डिफेन्स फोर्सने (आयडीएफ) गाझामध्ये प्रवेश केल्याचे म्हटले आहे. आम्ही गाझामध्ये आमचे ग्राउंड ऑपरेशन वाढवत आहोत. आम्ही 2 आठवड्यांपासून जमिनीवरील हल्ल्याची तयारी करत होतो. आम्ही अद्याप पूर्ण हल्ला केलेला नाही पण आम्ही हळूहळू जमिनीवरील हल्ल्याची व्याप्ती वाढवत आहोत, असे इस्रायलच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 26 ऑक्टोबर रोजी इस्रायली सैन्याने पहिल्यांदा गाझापट्टीत रणगाड्यांसह प्रवेश केला.
इस्रायलने शनिवारी पुन्हा एकदा गाझापट्टीमध्ये तीव्र हल्ला चढवला. गाझामध्ये पुन्हा एकदा स्फोटकांचा आवाज येत होता आणि लढाऊ विमानांच्या घिरट्या दिसून येत होत्या. इस्रायलचे एक क्षेपणास्त्र दाट लोकवस्तीच्या भागात पडले, असे इस्रायली हवाई दलाचे ऑपरेशन प्रमुख ब्रिगेडियर जनरल गिलाड कीनन यांनी सांगितले. ‘आयडीएफ’ने शनिवारी सकाळपर्यंत उत्तर गाझावर तोफखाना हल्ले सुरू ठेवले. त्यापूर्वी इस्रायली सैन्याने रात्री जमिनीच्या मार्गाने गाझामध्ये काही काळ प्रवेश केला होता. ठराविक क्षेत्रात कारवाई केल्यानंतर सैन्य व रणगाडे माघारी फिरले. यासंबंधी इस्रायली लष्कराने शनिवारी एक व्हिडिओ जारी केला असून त्यामध्ये गाझामधील मोकळ्या वालुकामय भागात चिलखती वाहने हळूहळू फिरताना दिसत आहेत.
‘युएन’मध्ये युद्धबंदीचा ठराव मंजूर
इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला असतानाच शुक्रवारी रात्री संयुक्त राष्ट्र महासभेत इस्रायल-हमास युद्ध थांबवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. प्रस्तावाच्या बाजूने 120 मते पडली, तर 14 देशांनी विरोधात मतदान केले. भारतासह 45 देशांनी मतदानात सहभाग न घेता तटस्थ भूमिका घेतली. अमेरिका आणि इस्रायलने या ठरावाच्या विरोधात मतदान केले. ‘हमासला असे अत्याचार करू देऊन आम्ही शांत बसणार नाही. इस्रायलला स्वत:चा बचाव करण्याचा अधिकार आहे. अशा अत्याचारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्हाला हा अधिकार आहे. हमासचा संपूर्ण नाश झाला तरच अत्याचारांची मालिका थांबेल’, असे इस्रायलचे राजदूत गिलाड एर्डन यांनी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत सांगितले.









