भूमीवरील कारवाईसाठी सैन्याला सज्जतेचा आदेश
► वृत्तसंस्था / तेल अवीव
दोन आठवड्यांपूर्वी आपल्या देशावर दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यानंतर हमास या दहशतवादी संघटनेचा नायनाट करण्याचा निर्धार केलेल्या इस्रायलने हमासवरील आपला जोरदार वायुहल्ला सुरुच ठेवला आहे. त्याशिवाय सैन्यालाही भूमीवरील कारवाई करण्यासाठी आदेश देण्यात आला असून लवकरच हे सैन्य गाझपट्टीत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गाझापट्टीत हमासने तयार केलेली भुयारेच आता या संघटनेच्या दहशतवाद्यांसाठी कब्रस्थाने बनणार आहेत, असा इशारा इस्रायलच्या सैन्यप्रमुखांनी दिला आहे. इस्रालयचे शेकडो रणगाडे आणि 50 हजारांहून अधिक सैनिक गाझामध्ये प्रवेश करण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून सज्ज आहेत. तथापि, प्रत्यक्ष प्रवेशाचा निर्णय पूर्ण विचाराअंती घेतला जाणार आहे. सध्या इस्रायलकडून गाझापट्टीतील भुयारांचे सर्वेक्षण सुरु असून त्यांच्यात प्रवेश करण्यामध्ये धोक्याचे प्रमाण किती, हे पडताळले जात आहे. तोपर्यंत गाझा पट्टीवर वायूहल्ले करुन ती पिंजून काढून हमासचा शस्त्रसाठा नष्ट करणे आणि या संघटनेच्या दहशतवाद्यांना दमवणे हे तंत्र इस्रायलकडून उपयोगात आणले जात आहे, असे तज्ञांचे मत आहे.
लेबेनॉनवरही हल्ले
इस्रायलच्या वायुसेनेने उत्तर आघाडीवर लेबेनॉनवरही हल्ले चढविले असून तेथील हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेची अनेक ठाणी उद्ध्वस्त केली. गुरुवारी रात्रीपासून हे हल्ले सुरु आहेत. हिजबुल्लानेही इस्रायलवर काही अग्निबाण डागून त्याची हानी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आयर्न डोम व्यवस्थेमुळे हे हल्ले निकामी ठरले.
इराणकडून दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे
इराणकडून गाझापट्टीतील हमास आणि लेबेनॉनमधील हिजबुल्ला या दहशतवादी संघटनांना दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे पुरविली जात आहेत, असे वृत्त आहे. दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे इस्रायलच्या आर्यन डोम तंत्रज्ञानाला चकवा देऊ शकतील अशी इराणची समजूत आहे. तथापि, इस्रायलच्या म्हणण्यानुसार हे तंत्रज्ञान कोणत्याही प्रकारच्या क्षेपणास्त्रांविरोधात उपयोग होईल असे आहे.
अमेरिकेचे साहाय्य
अमेरिकेच्या दोन विमानवाहू युद्धनौका सध्या भूमध्य समुद्रात इस्रायलच्या साहाय्यासाठी पाठविण्यात आल्या आहेत. याशिवाय अमेरिकेच्या साधारणत: चाळीस युद्धनौकाही कार्यरत करण्यात आल्या आहेत. हिजबुल्लाहकडून इस्रायलवर सोडण्यात आलेली 40 हून अधिक क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या युद्ध नौकांनी नाकाम केली. अमेरिकेच्या युद्धनौकाही क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणेसह सज्ज आहेत.
ग्रीक चर्च उद्ध्वस्त
इस्रायलच्या बाँब हल्ल्यात गाझा पट्टीतील जुने ग्रीक पारंपरिक चर्च उद्ध्वस्त झाले. या हल्ल्याचा कॅथोलिक चर्चच्या प्रमुखांनी निषेध केला असून त्याची चौकशी करण्याची मागणी केली. या संघर्षात चर्चवर हल्ले करण्यात येत असून हे युद्धगुन्हे आहेत, असा आरोप चर्चच्या प्रमुखांनी केला. जेरुसलेम येथील चर्चनेही या हल्ल्याचा निषेध केला. व्हॅटिकननेही याचा निषेध केला आहे.
नेतान्याहूंची सैनिकांना भेट
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दक्षिण आघाडीवरील आपल्या सैनिकांची भेट घेत चर्चा केली. त्यांनी तेथील सज्जतेचीही पाहणी केली. दहशतवाद्यांविरोधात आपल्याला दीर्घकालीन युद्ध करावयाचे असून ते जिंकायचेही आहे. त्यामुळे सर्व सैनिकांनी आदेशाची प्रतीक्षा करावी. सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी असून हमासचा नायनाट करणे हे आपले ध्येय आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
गाझात पाणीपुरवठा सुरु
इस्रायल आणि ईजिप्त यांच्या अनुमतीमुळे गाझापट्टीत काही प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच अन्न आणि औषधे यांच्या पुरवठ्याचीही व्यवस्था करण्यात येत आहे. ईजिप्तच्या सायनाय प्रांतातून अन्नसामुग्रीचे ट्रक्स गाझाच्या सीमारेषेवर असून त्यांना टप्प्याटप्प्याने आत सोडण्यात येईल अशी माहिती देण्यात आली. यामुळे या पट्टीतील शरणार्थींना थोडा दिलासा मिळाला.
शुक्रवारी दिवसभरात…
ड लेबेनॉन आणि गाझावर इस्रायलचे वायुहल्ले, क्षेपणास्त्रे पाडली
ड नेतान्याहू यांची दक्षिण आघाडीला भेट, सैनिकांना दिला धीर
ड अमेरिकेच्या युद्धनौकांचे इस्रायलला साहाय्य, शस्त्रांचा पुरवठा
ड इस्रायल लवकरच गाझात सैनिक पाठवून कारवाई सुरु करणार









