नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी उठविला आवाज : लवकरच दुरुस्ती करण्याचे आश्वासन
बेळगाव : सदाशिवनगर येथील स्मशानभूमीच्या शेडवरील पत्रे पूर्णपणे खराब झाले आहेत. कधी कोसळतील याची शाश्वती नाही. त्यामुळे नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी बुधवारी झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेमध्ये यावर जोरदार आवाज उठविला. तातडीने त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली. त्यावर अधिकाऱ्यांनी लवकरच त्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले. सदाशिवनगर स्मशानभूमीकडे मनपाचे दुर्लक्ष झाले आहे. शेड खराब झाल्याने ते पत्रे कधी कोसळतील याची शाश्वती नाही. यासाठी मागील सर्वसाधारण सभेमध्येही त्यावर चर्चा झाली होती. मात्र अधिकाऱ्यांनी अजूनही त्याची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे नगरसेवक शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे यांनी महापौरांकडे तक्रार केली होती. मागील सभेतच त्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते. सहा महिने उलटले तरी दुरुस्ती झाली नसल्याने पुन्हा शिवाजी मंडोळकर यांनी आवाज उठविला. त्यामुळे अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी लवकरच त्याची दुरुस्ती करू, असे आश्वासन दिले. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनीही यावेळी जातीने लक्ष देऊन त्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी नगरसेवक रवी साळुंखे आणि वैशाली भातकांडे यांनीही शहापूर, वडगाव या स्मशानभूमीकडेही लक्ष देऊन तेथील समस्या सोडवाव्यात, अशी मागणी केली.









