श्रीपाद श्रीवल्लभाचे चरित्रामृत प्राशन करून दत्तजयंतीनिमित्त सर्व भक्तगण धन्य होतात. कारण दत्तस्थानाचे अक्कलकोट, गाणगापूर, कडगंजी, कुमसी, मंथनगड, हुमनाबाद आणि कुरवपूर ही प्रत्यक्ष असून असंख्य भक्तगणांची ओढ लागते कुरवपुराची. ही सर्व स्थाने विलक्षण आनंद देणारी आहेत. कारण उपासनेच्या माध्यमातून आत्मिक बळ मिळवून मानवी जीवनातील कर्तव्य पूर्ण करत परमेश्वराची प्राप्ती करणे हा दत्त उपासनेचा खरा मार्ग आहे.
महाराष्ट्रात दत्त संप्रदायाचा सर्वाधिक प्रसार झाला. यामुळे महाराष्ट्रात देखील प्रसिद्ध अशी दत्तस्थाने आहेत. दत्त उपासनेला श्री नृसिंहसरस्वतीमुळे दत्त संप्रदायाचे स्वरुप प्राप्त झाले. श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रयाचे (पिठापूर) पहिले अवतार मानले जातात. तर कुरवपूर हे त्यांचे अक्षय निवासस्थान होय.‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या मंत्राचा उगम ज्या ठिकाणी झाला ते स्थान प्राचिन तपोभूमी असलेले कुरवपूर (कुरगड्डी) हे आहे.
“स्थान उत्तम शोधुनी, त्रिभुवनी नाही, असे पाहुनी
आला सत्वर पातला कुरवपुरी एकांतरोह वनी’’
श्री दत्तात्रेयांचे कलीयुगातील प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांनी तपश्चर्येसाठी कृष्णामाईच्या नाभीस्थान असलेल्या कुरवपूर या सिद्धबेटाची निवड केली. भगवान दत्तात्रेय यांनी सुमती व आपलराज यांना दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांच्या पोटी जो प्रथम अवतार संपन्न केला ते श्रीपाद श्रीवल्लभ होय. वयाच्या सोळाव्या वषी माता-पित्याचा निरोप घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ प्रथम गोकर्ण महाबळेश्वरला गेले व तेथून श्रीशैल पर्वतावर जाऊन तेथे काही काळ वास्तव्य करून फिरत फिरत ते कुरवपूर येथे आले. तेथे त्यांनी बावीस वर्षे तपश्चर्या करून तेथेच अंतर्धान पावले. गुरू चरित्रातील अध्याय आठ, नऊ व दहामधील वर्णनानुसार अश्विन वद्य द्वादशीला देह समाप्त करून कृष्णेत अदृश्य
झाले.
त्या काळात श्रीक्षेत्र कुरवपूर स्वातंत्र्यापूर्वी निजामच्या राज्यात होते. सध्या ते कर्नाटकात रायचूर जिल्हय़ात आहे. रायचूरपासून 29 कि. मी. वर आतकर हे गाव आहे. तेथे कुरवपूर बेटावर जाण्यासाठी चालत जाऊन कृष्णेच्या काठावर जावे लागते. कुरुगुड्डी या छोटय़ा खेडय़ाजवळ कृष्णा नदीचे नैसर्गिकरीत्या दोन भाग झालेले आहेत आणि ते पुढे एकत्र देखील आलेले आहेत. जेथे कृष्णेचे विभाजन झाले आहे, त्या भागाला ‘कुरगुड्डी बेट’ म्हणतात. हेच ते श्रीपाद शिवलिंगाचे स्थान. याच बेटावर दगडांच्या गुहेत श्रीपाद श्रीवल्लभ तपश्चर्या करत. तसेच या गुहेसमोर मोठय़ा औदुंबर वृक्षाखाली अनु÷ान करत असे. याच बेटावर पाच घरात माधुकरी मागून ते उदरनिर्वाह करत असत. 1982 पासून कुरवपूर येथील पुजारी श्रीपादभट्ट केळकर यांच्या प्रेरणेने नावेची सोय झाली आहे. कृष्णा नदी पार करण्याचा अजब अनुभव या वेगवेगळय़ा मोसमात वेगवेगळा असतो. पात्रात सभोवार अजस्त्र शिळा आहेत. एकामागून एक असे चार प्रवाह ओलांडून पैलतिरी जाऊ
शकतो.
श्रीपाद श्रीवल्लभ सकाळी उठल्यावर नदीवर स्नान करून सूर्यनमस्कार घालत असता, ते ज्या शिळेवर उभे राहून सूर्यनमस्कार घालत त्यांची त्या शिळेवर पडणारी छाया अजूनही स्पष्ट दिसते. त्यांच्या पावलांच्या खुणाही त्या शिळेवर स्पष्टपणे दिसतात. ते क्षेत्र अंतर्मुख करणारे असून कित्येक वर्षे हे क्षेत्र अज्ञातच होते. पण श्री गुरुंच्या शोधात असलेले श्री वासुदेवानंदसरस्वती टेंबेस्वामी महाराज यांनी त्या स्थानाचा शोध लावला. सध्या डिसेंबर ते फेब्रुवारी हे तीनच महिने दर्शनासाठी योग्य असे आहेत.
अश्विन वद्य द्वादशी हा श्रीपाद श्रीवल्लभ यांचा निजानंदगमनाचा दिवस असून या दिवशी कुरवपुरात फार मोठा उत्सव असतो. श्रीपाद श्रीवल्लभ यांचे मंदिर ऐसपैस असे भव्य असून दरवाजाजवळ दोन्ही बाजूस दोन दगडी कट्टे आहेत. शेजारी दगडी भिंत असून महाद्वारावर कमान आहे. तेथून नम्रपणे वाकून जाऊन आत जाता येते. आत बसण्यासाठी दोन देवडय़ा आहेत. त्या परिसरात अश्वत्थ (पिंपळ), कडुनिंब वृक्ष असून तेथे दगडी पार बांधलेला आहे. याच पारावर दक्षिणाभिमुख दोन मंदिरे असून एका मंदिरात दक्षिणाभिमुख काळय़ा शालिग्राम शिळेची मारुतीची रेखीव मूर्ती आहे आणि दुसऱया मंदिरात शिवलिंग व केशवमूर्ती पादुका आहेत. याच पारासमोर मुख्य पूजास्थान असून तेथेच श्रीपाद श्रीवल्लभ जप-तप अनु÷ानाची कर्मे करत. यालाच ‘निर्गुण पीठ’ पार म्हणतात. या पारावर असणारा वृक्ष हा सुमारे 900 वर्षांपूर्वीचा आहे, त्याच्या ढोलीत मोठा सर्प आहे, असे सांगितले जाते.
पंचदेव पहाड या गावाजवळ दत्त उपासक विठ्ठल बाबांनी वल्लभपूरम नावाचा आश्रम स्थापन करून तेथे येणाऱया भक्तांसाठी निवासाची व भोजनाची व्यवस्था केलेली आहे. या बेटावर असणारा औदुंबराचा वृक्ष अत्यंत डौलदार आहे. या ठिकाणी पारायण करण्यासाठी कट्टा बांधलेला आहे. संपूर्ण बेट म्हणजे एक तपोभूमीच असून गुरुदत्तांची सेवा, पारायण, जप, अनु÷ान इत्यादी मार्गाची सेवा करणाऱयांसाठी स्वर्गभूमी आहे. लाखो रुपये खर्चूनही न मिळणारी शांतता व एकांत तेथेच अनुभवाला येतो. अनेक महात्मे येऊन गेल्याने कुरवपूर ही त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. यात प्रामुख्याने श्री टेंबेस्वामी, श्रीधरस्वामी, श्री नानामहाराज तराणेकर, श्री पोखरापूरकर महाराज, श्री गुळवणी महाराज, श्री कविश्वर, श्री मामा देशपांडे, इत्यादी महात्म्यांनी या ठिकाणी मुक्काम केला होता.
सद्य परिस्थितीत श्रीपाद श्रीवल्लभ हे अव्यक्त रूपात राहून भक्तांचे कल्याण करतात. श्रीपाद श्रीवल्लभ यांचे रूप वर्णन केल्याप्रमाणे तेजःपुंज, गौरवर्ण, रेशमी भगव्या रंगाची कफनी, गळय़ात रुद्राक्षमाळा, रुद्राक्षाची कर्णकुंडले, जटाभार मस्तकी रूळलेला, हातात रुद्राक्षाची जपमाळ, कुबडीवर विश्रामलेला देह, सरळ सुंदर अशी नासिका, त्रिभुवनाचे प्रेम ओसंडून वाहणारे नेत्र, शुभ्र सरळ अशी दंतपंक्ती, पद्मासनात स्थित असलेले असे विलोभनीय रूप, यापुढे कोणता भक्त नतमस्तक होणार नाही? गुरुचरित्रात लिहिल्या गेलेल्या लीला आजही चालू आहेत. श्री गुरुचरित्रातील ‘कुरवपुरक्षेत्र महिमा’ नावाच्या दहाव्या अध्यायात आहे. जीवनात एकदातरी प्रत्येक व्यक्तीने कुरवपूर या स्वर्गभूमीत जाऊन मुक्त हस्ते सेवा करून मुक्तीचा आनंद घेऊन जीवन अमृतमय बनवून देह सार्थकी लावावा.
– रा. भ. अघोर








