पेट्रोल, गॅस टाकी, बॅटऱ्याकडे दुर्लक्षामुळे स्फोटाचा धोका : खबरदारीने दुर्घटना टाळणे शक्य: उन्हळ्यामध्ये अग्निशमन दल 24 तास अलर्ट : मदतीसाठी आणखी दोन क्रमांक कार्यान्वयित
इम्रान गवंडी कोल्हापूर
गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे. पारा 39 अंशावर पोहोचला आहे. दरवर्षी मार्च, एप्रिल व मे महिन्यात अशा वाढत्या उष्म्यामुळे आग लागण्याच्या घटनांत वाढ होत आहे. यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेवरही ताण पडत आहे. आग लागण्यामागे शॉर्ट सर्किट हे प्रमुख कारण असले तरी उन्हाळ्यामध्ये आगीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास गंभीर घटना टाळता येणे शक्य आहे.
उन्हाचा पारा वाढळल्यामुळे गाड्यांच्या पेट्रोल, गॅस टाकी व बॅटऱ्या अधिक गरम होऊन स्फोट होण्याचा धोका असतो. गाडीमधील सॅनिटायझर, परफ्युममधील गॅस ज्वलनशिल असल्यामुळे ते गरम होऊन त्याचा स्फोट होऊ शकतो. गाडीमध्ये डॅशबोर्डवर ठेवलेल्या पाणी बॉटलमधुन तीव्र उन्हाची किरणे परावर्तीत होऊन गाडीला आग लागण्याचा धोका असतो. शेत व शेतात असलेल्या गंजींमध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे मिथेन वायु तयार होतो. हा वायु ज्वलनशिल असल्यामुळे गंजीला आग लागण्याचे प्रमाण वाढते.
शॉर्ट सर्किट आगीचे प्रमुख कारण
स्लॅब आणि पत्र्याची घरे उन्हामुळे तापतात. उन्हाळ्यात गारव्यासाठी प्रत्येक घरात पंखे, एसी किंवा कूलरचा वापर वाढतो. यामुळे वीज यंत्रणेवर लोड वाढतो. विद्युत उपकरणे जास्त वेळ सुरू ठेवल्यामुळे यंत्र व विद्युत वायरींग अति गरम होऊन शॉर्ट सर्किट होते. यामुळे इमारती, घर, कारखाने, गोडगऊनला आग लागण्याच्या घटना घडतात. गॅसगळती किंवा अन्य चुकीमुळे कागद, प्लॅस्टिकचं साहित्य, रसायनं आणि फर्निचर पेट घेऊन आग लागण्याची शक्यता असते.
विद्युत उपकरणांची देखभाल दुरूस्ती आवश्यक
व्यावसायिकांसह घरामधील विद्युत उपकरणाची वेळच्या वेळी देखभाल दुरूस्ती करणे आवश्यक आहे. वायरींग जुने झाले असल्यास ते तत्काळा बदलणे गरजेचे आहे. यामुळे शॉर्ट सर्कींटचा धोका टळतो.
वाहनांच्या पेट्रोल व गॅस टाक्यांचा स्फोट होण्याचा धोका
बहुतांश राज्यांमध्ये तापमानात लक्षणीय होत असुन उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. वाढत्या उष्म्यामुळे गाड्यांच्या पेट्रोल व गॅसची टाकी क्षमतेपेक्षा जास्त गरम होतात. यामुळे गाडयांचा स्फोट होण्याच्या धोका असतो.
अग्निशमन दल 24 तास तत्पर :
शहरात कुठेही आग लागली की, महापालिकेचा अग्निशमन दल 24 तास तत्पर असतो. कर्मचारी संख्या कमी असली तरी कर्त्यव्यात कसूर ठेवली जात नाही. आगीची वर्दी मिळाल्या तत्काळ मदत मिळते.
मदतीसाठी आणखी दोन क्रमांक कार्यान्वयित
आगीपासून मदतीसाठी 101 या टोलफ्री क्रमांक आहे. जलद मदतीसाठी अग्निशमन दलाच्यावतीने 8956412102 व 8956412103 हे आणखी दोन क्रमांक कार्यान्वयित केले आहेत. या नंबरची सेवा 24 तास सुरू असुन नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
2023 मध्ये घडलेल्या आगीच्या घटना :
महिना आगीच्या घटना
-मार्च 6
-एप्रिल 9
-मे 4
एकूण 17
शहरातील फायर स्टेशन
महापालिका फायर स्टेशन, ताराबाई पार्क फायर स्टेशन, कसबा बावडा, टिंबर मार्केट फायर स्टेशन, फुलेवाडी फायर स्टेशन, प्रतिभानगर फायर स्टेशन.
उन्हाळ्यात खबरदारी घ्यावी
उन्हामुळे आगीच्या घटनांत वाढ होते. यामध्ये शॉर्ट सर्किट हे प्रमुख कारण आहे. वाहने अधिक काळ उन्हामध्ये लावू नयेत. पेट्रोल टाकी, गॅस व बॅटरी गरम होऊन स्फोट होण्याचा धोका असतो. शेतामध्ये असणाऱ्या गंजींची उंची कमी असावी. नागरिकांनी योग्य काळजी घेतल्यास आगीच्या घटना टाळता येऊ शकतात.
मनिष रणभिसे, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा
अग्निशमन दलातील कर्मचारी संख्या :
-मंजूर पदे : 182
-कायम सेवेतील : 22
-ठोक मानधन : 42
-ड्रायव्हर : 18 (केएमटीचे ड्रायव्हर वर्ग)
-ठेकेदारामार्फत घेतलेले कर्मचारी : 12
-एकूण रिक्त पदे : 118
मनपा अग्निशमन स्टेशनची संख्या : 6