राज्यातील विविध वृत्तपत्रात मुख्यमंत्री आणि शिंदे गटाने दिलेल्या जाहीरातीवरून राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपच्या नेतृत्वात यापुर्वी देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र अशी घोषणा वापरण्यात येत असतानाच शिंदे गटाने राज्यामध्ये राष्ट्रात मोदी..महाराष्टात शिंदे अशी जाहीरात चालवल्याने भाजपमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत. विरोधकांनी या गोष्टीचा फायदा घेउस भाजप- शिंदे गटाच्या युतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
विरोधी पक्षांच्या या आरोपावर मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण घरात बसून काम करणारा मुख्यमंत्री नाही असे बोलून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टोला हाणला. ते म्हणाले, “आमचं सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. ‘हे डबल इंजिन’चं सरकार आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात निधी आणि आर्थिक पाठबळ दिलं जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात मेट्रो, पायाभूत सुविधांचे प्रकल्प बंद होते, ते आम्ही तात्काळ सुरू केले.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “मुंबईतच नाहीतर संपूर्ण राज्यात वेगवान प्रकल्प सुरू असून राज्याला पुढं नेण्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहे. आम्ही प्रत्यक्ष रस्त्यावर, शेतकऱ्यांच्या बांधावर आणि विविध प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी जातो. आम्ही घरात बसून काम करत नाही,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आपल्या जनतेतील लोकप्रियतेवर बोलताना ते म्हणाले, “एका सर्वेच्या माध्यमातून राज्यातील जनतेने मला आणि देवेंद्र फडणवीसांना सर्वात जास्त पसंती दिल्याने आम्ही आणखी जोमाने काम करू. सर्वसामान्य लोकांना आमच्या कामाचा फायदा होईल. आम्ही पाठऴलेले सर्व प्रस्ताव पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह मंजूर करत आहेत. म्हणून विकासाचे प्रकल्प जोरात, जोमात आणि वेगात पुढं नेत आहे,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
शिवसेना-भाजपा युती ही बाळासाहेबांच्या विचाराने झाली आहे. ही एक वैचारिक युती असून लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढत विकासाच्या मुद्द्यावर जिंकू,” असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.








