तीन दिवसांत 98 जणांचा मृत्यू : ओडिशा, विदर्भ, पश्चिम बंगालमध्ये उष्णतेचा इशारा
वृत्तसंस्था / पाटणा, लखनौ
देशातील अनेक भागात सध्या उष्णतेची लाट आहे. उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू, मध्यप्रदेश, झारखंड, विदर्भ, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये उष्णतेच्या झळांचा प्रकोप वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेबाबत रेड अलर्ट जारी करण्यात आला असून उत्तर प्रदेशवासियांनाही तीव्र झळांचा सामना करावा लागत आहे. बिहारमध्ये गेल्या तीन दिवसात 98 मृत्यूंची नोंद झाली असून अनेक लोक वेगवेगळ्या भागात उपचार घेत आहेत.
भारतातील अनेक राज्ये उष्णतेच्या आणि उकाड्याच्या तडाख्यात आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने आपल्या ताज्या अधिसूचनेत उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू, मध्यप्रदेश, झारखंड, विदर्भ, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, तेलंगणा यासारख्या विविध प्रदेशांमध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती गंभीर ते अतिशय तीव्र होण्याचा अंदाज वर्तवला आहे. यानंतर काही राज्यांनी शाळा सुरू होण्याच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. तीव्र उष्णतेमुळे तापमानात वाढ झाली असतानाच येत्या 2 ते 3 दिवसांत पूर्व भारतात मान्सून दाखल होण्याची शक्मयता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासोबतच मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस पडू शकतो, तर पुढील 2-3 दिवसात उत्तर प्रदेश आणि दिल्ली-एनसीआरमध्ये हलका पाऊस पडू शकतो, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेचा विक्रम
बिहारमधील उष्णतेच्या लाटेच्या स्थितीमुळे आयएमडीने राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे. उष्णतेच्या लाटेने गेल्या 11 वर्षांचा विक्रम मोडला आहे. यापूर्वी 2012 मध्ये 19 दिवस सतत उष्णतेची लाट होती. यावेळी 20 दिवसांपासून उष्णतेची लाट आहे. येथील तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील अनेक जिह्यांमध्ये बारावी पर्यंतच्या शाळा 24 जूनपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे झारखंडमध्ये शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशमध्येही कडक उन्हामुळे शाळांनी प्रवेशारंभ पुढे ढकलला आहे.
बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राजस्थानच्या नैर्त्रुत्य आणि आग्नेय भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्मयता आहे. दुसरीकडे, ईशान्य राजस्थानमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. सोमवार आणि मंगळवारी पश्चिम मध्यप्रदेश आणि दक्षिण पश्चिम उत्तर प्रदेशात पावसाची शक्मयता आहे. रविवारी उत्तर गुजरातच्या काही भागात मुसळधार पाऊस पडला. पुढील काही दिवस ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्मयता आहे.









