कमाल तापमान 41.8 अंश सेल्सिअस, वेधशाळेकडून नोंद
बेळगाव : उष्णतेत प्रचंड वाढ झाल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. मंगळवार व बुधवारी बेळगावचे कमाल तापमान 41.8 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. यावर्षीचे हे सर्वाधिक तापमान असल्याने वातावरणात प्रचंड उष्णता जाणवत होती. यामुळे दुपारच्या सुमारास बाजारातही शुकशुकाट दिसून आला. मागील महिन्याभरापासून बेळगावच्या तापमानात कमालीची वाढ झाली. मागील वर्षापर्यंत 38 अंश सेल्सिअसपर्यंत जिल्ह्याचे तापमान जात होते. परंतु यावर्षी ते 41 पर्यंत पोहोचले आहे. अद्याप एप्रिल महिना येणे बाकी असून तापमानात अजून किती वाढ होते हे पहावे लागणार आहे.
एरव्ही बेळगावला गरिबांचे महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. परंतु सध्या एखाद्या वाळवंटाप्रमाणे याठिकाणी उष्णता जाणवत आहे. कर्नाटक वेधशाळेने बुधवारी जाहीर केलेल्या एका पत्रकानुसार बेळगावचे किमान तापमान 19.4 तर कमाल तापमान 41.8 अंश सेल्सिअस इतके असल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील सर्वाधिक तापमान असलेल्या पहिल्या चार जिल्ह्यांमध्ये बेळगावचे स्थान असल्याने याचे परिणाम भविष्यात भोगावे लागणार आहेत. वाढते शहरीकरण आणि बेसुमार वृक्षांची झालेली तोड यामुळे तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
छत्रीचा आधार…
उष्णतेत वाढ झाल्याने सकाळी 11 नंतर छत्री घेऊनच बाहेर पडावे लागत आहे. दुपारचे ऊन पाहता खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. सायंकाळी 5 नंतर खरेदीसाठी नागरिक बाहेर पडत आहेत. याचबरोबर शीतपेय व सरबतांची मागणी मात्र मोठ्या प्रमाणात वाढली आहे.









