सांगली :
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 18 वर्षापर्यंतच्या ह्रदयरोग संशयित बालकांसाठी नुकतेच मोफत 2 डी इको शिबीर घेण्यात आले. ठाणे येथील सिध्दाविनायक हॉस्पिटलचे बालह्रदयरोगतज्ञ डॉ. भूषण चव्हाण यांनी 128 बालकांची मोफत तपासणी केली. यामध्ये 33 बालकांवर मुंबईतील पंचतारांकित रुग्णालयामध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात करण्यात येणार आहेत. या योजनेतून आतापर्यंत सुमारे दोन हजार बालकावर हृदयशस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पना व प्रयत्नामधून आयोजित हे शिबीर सिव्हील हॉस्पिटलमध्ये घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सारंगकर उपस्थित होते.
- दोन हजारावर शस्त्रक्रिया
शिबीरातील 128 लाभार्थींच्या इको तपासणीचा अंदाजित खर्च 4 लक्ष रूपये व अंदाजित 33 लाभार्थ्यांच्या शस्त्रक्रियाचा प्रति शस्त्रक्रिया अंदाजित 3 लक्ष रूपये प्रमाणे एकूण खर्च 1 कोटी, याप्रमाणे एकत्रित एकूण 1 कोटी 4 लक्ष रुपयांचे कामकाज जिल्हाधिकारी काकडे यांच्या संकल्पनेतून पूर्णपणे मोफत होणार आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आजअखेर 1 हजार 850 लाभार्थ्यांच्या ह्रदय शस्त्रक्रिया व 28 हजार 500 लाभार्थ्यांच्या इतर शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आहेत.
यासाठी लाभार्थीनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांना पुष्पगुच्छ देवून आभार व्यक्त केले. जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, कार्यक्रम सहायक अनिता हसबनीस व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अधिकारी व कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.








