याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालय सहमत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक अधिनियम (पीएमएलए)च्या विविध तरतुदी कायम ठेवण्याशी संबंधित निर्णयाच्या विरोधात दाखल पुनर्विचार याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शविली आहे. सर्वोच्च न्यायालयात आज या याचिकेवर सुनावणी होणार आहे. 27 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) अधिकार अन् प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्टला आव्हान देणाऱया याचिकांवर निर्णय देत ईडीला अटक करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले होते.
मनी लॉन्ड्रिंग ऍक्टमध्ये कुठलीही त्रुटी नसल्याचे न्यायालयाने 240 याचिकांवर सुनावणी करताना म्हटले होते. 2018 मध्ये मनी लॉन्ड्रिंग ऍक्टमध्ये झालेले बदल योग्य आहेत. ईडीकडून अटकेची कारवाई अन् आरोपेंची चौकशी करण्यात काहीच गैर नसल्याचे न्यायालयाने नमूद केले होते.
ईडीकडून अटकेची कारवाई झाल्यास त्याला मनमानी म्हणता येणार नाही. चुकीच्या मार्गाने पैसा कमाविणाऱया लोकांवर कारवाई करता यावी म्हणूनच ईडीकडे अशाप्रकारचा अधिकार असल्याचे न्यायाधीश ए.एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले होते.









